Join us

हमीभावाने कापूस उत्पादक उद्ध्वस्त!

By admin | Updated: November 17, 2014 03:18 IST

महाराष्ट्र सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहे; पण येथेही कमी आणि जास्त लांबीच्या धाग्याचे निकष लावून ४,०५० रूपयांपेक्षा कमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे

राजरत्न सिरसाट, अकोलाकेंद्रीय कृषी विभागाने हमीभाव जाहीर करताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निराशेच्या गर्तेत टाकले असून, बाजारातही कापसाचा सरासरी भाव ३,९०० ते ३,९५० रुपये प्रति क्ंिवटलच्या पुढे सरकला नसल्याने राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.महाराष्ट्र सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहे; पण येथेही कमी आणि जास्त लांबीच्या धाग्याचे निकष लावून ४,०५० रूपयांपेक्षा कमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने शेतकऱ्यांची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी हमी घेण्याची गरज आहे. केंद्रीय कृषी विभागाने या खरीप हंगामासाठी कापसाला हमीभाव (एमएसपी) जाहीर केले आहेत. यामध्ये मध्यम धाग्याच्या कापसाला ३,९०० रुपये ते ३९५० रुपये प्रति क्विंटल भाव असून, लांब धाग्याच्या कापसाला ४,०५० रुपये प्रति क्ंिवटल भाव जाहीर केले आहेत; परंतु अल्प पावसामुळे यावर्षी विदर्भ, मराठवाड्यातील कापसाचे उत्पादन घटले असून, एकरी दोन ते तीन क्विंटलपेक्षा कमी उतारा आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावात उत्पादन खर्च निघणे दुरापास्त झाल्याने राज्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. राज्यात यावर्षी कापूस क्षेत्र घटले आहे. विदर्भात हे क्षेत्र १८ लाखांहून १२ लाख हेक्टरपर्यंत खाली आले आहे. पुरेसा पाऊस नसल्याने यावर्षी कापूस पिकावर दुष्परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सामाजिक सुरक्षितता म्हणून केंद्र सरकारने घोषित केलेल्या हमी भावापेक्षा २५ ते ३० टक्के रक्कम वाढवून दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.