Join us

गुलाबराव पोळ यांच्यावर कारवाई व्हावी

By admin | Updated: July 11, 2014 21:45 IST

अंनिसची मागणी : जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

अंनिसची मागणी : जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आत्मा, पुनर्जन्म, प्लँचेट यासारख्या अंधश्रद्धांच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला, त्यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लँचेटचा आधार घेतला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
प्लँचेट प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी. पोलिसांबद्दल जनतेच्या मनात असलेल्या विश्वासार्हतेला तडा जाऊ नये आणि पोलीस खात्याबद्दलची प्रतिमा वृद्विंगत व्हावी याकरिता ही कारवाई होणे आवश्यक असल्याचे अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.
मुंबईत बसून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाचा तपास करीत आहेत. त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नूसन त्यांना मराठी भाषेबाबत अडचणही जाणवत आहे. त्यांच्या तपासातील अडचणी दूर होऊन तपास गतीमान व्हावा याकरिता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली. अंनिसचे शिष्टमंडळ १४ ते १६ जुलै दरम्यान दिल्ली येथे जाणार आहे. यावेळी राज्याप्रमाणे केंद्रातही जादूटोणा विरोधी कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार असल्याचे दाभोलकर यांनी स्पष्ट केले.