Join us  

निफ्टीमध्ये ९ महिन्यांतील सर्वाधिक साप्ताहिक वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 1:18 AM

भारतातील चलनवाढीचा दर कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करतानाच, रिझर्व्ह बॅँकेने आर्थिक विकासाचा दर वाढण्याची वर्तविलेली शक्यता आणि कायम राखलेले व्याजदर, तसेच परकीय वित्तसंस्थांनी केलेली गुंतवणूक, यामुळे सप्ताह तेजीचा राहिला.

भारतातील चलनवाढीचा दर कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करतानाच, रिझर्व्ह बॅँकेने आर्थिक विकासाचा दर वाढण्याची वर्तविलेली शक्यता आणि कायम राखलेले व्याजदर, तसेच परकीय वित्तसंस्थांनी केलेली गुंतवणूक, यामुळे सप्ताह तेजीचा राहिला. निफ्टी या निर्देशांकाने जुलै २०१७ नंतर प्रथमच सर्वाधिक साप्ताहिक वाढ नोंदविली. बाजाराचा संवेदनशील निर्देशांकही सप्ताहामध्ये २ टक्क्यांनी वाढला.गतसप्ताह बाजारात तेजीचा राहिला. बुधवारचा अपवाद वगळता सर्वच दिवस बाजार वाढत होता. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३३०३०.८७ असा वाढीव पातळीवर खुला होऊन, ३३६९७.५१ अंश असा उच्चांकी पोहोचला. तो ३२९७२.५४ अंशांपर्यंत खालीही आला. सप्ताहाच्या अखेरीस तो ३३६२६.९७ अंशांवर बंद झाला. सप्ताहामध्ये त्यात मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत ६५८.२९ अंश म्हणजेच २ टक्के वाढ झाली.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) जुलै २०१७ नंतर प्रथमच या सप्ताहामध्ये सर्वाधिक म्हणजे २.१५ टक्क्यांनी वाढलेला दिसून आला. सप्ताहामध्ये २१७.९० अंशांची भर घालून तो १०३३१.६० अंशांवर बंद झाला. सप्ताहातील एका दिवसाचा अपवाद वगळता निर्देशांक सातत्याने वाढला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ६३३.९८ आणि ८८८.६३ अंशांची वाढ नोंदविली गेली.रिझर्व्ह बॅँकेने आपल्या द्वैमासिक पतधोरणामध्ये व्याजदर कायम ठेवतानाच चलनवाढ कमी होण्याचा, तसेच अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर जास्त असण्याचा अंदाज व्यक्त केल्याने बाजाराला उभारी मिळाली आणि चांगली वाढ नोंदविली गेली. त्यातच परकीय वित्तसंस्थांनी पाच दिवसांमध्ये ३,७०६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक मुख्यत: कर्जरोख्यांमध्ये आहे. अमेरिकेतील व्याजदरांमध्ये एवढ्यात वाढ होण्याची शक्यता संपल्याने गुंतवणूक वाढली. जागतिक शेअर बाजारांमध्ये मात्र मंदी दिसून आली. अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध अधिक टोकदार होण्याचे संकेत मिळत आहेत.>देशाच्या परकीय चलन गंगाजळीने गाठला उच्चांकभारताच्या परकीय चलन गंगाजळीने ३० मार्च रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये नवीन उच्चांक गाठला आहे. आता ही गंगाजळी ४२४.३६१ अब्ज डॉलरची झाली आहे. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये १.८२८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.भारतीय रिझर्व्ह बॅँकेने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. परकीय चलनातील मालमत्ता म्हणजेच, अमेरिकन डॉलर, युरो, पौंड स्टर्लिंग आणि येन यांचे मूल्य डॉलरमध्ये मोजून, त्यापासून परकीय चलनाच्या गंगाजळीचा हिशोब केला जातो. भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडून परकीय चलनात केल्या जाणाऱ्या खरेदी-विक्रीमुळे परकीय चलनाच्या साठ्यामध्ये बदल होतो.देशाच्या सोन्याच्या राखीव साठ्यामध्ये मात्र स्थिरता दिसून आली आहे. देशातील सोन्याचा राखीव साठा २१.६१४ अब्ज डॉलरवर टिकून आहे. आधीच्या सप्ताहातही तो तेवढाच होता.

टॅग्स :निर्देशांकनिफ्टी