तेजस वाघमारे, मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागानेही विविध प्राधिकरणे आणि संस्थांमार्फत २०२० पर्यंत बांधण्यात येणाऱ्या घरांचे टार्गेट निश्चित केले आहे.या टार्गेटनुसार २०२० पर्यंत राज्यात ६ लाख ५८ हजार ४३५ घरे निर्माण होणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागाने मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्याकडून राज्यात २० लाखांहून अधिक घरे उभारण्याच्या घोषणा केवळ घोषणाच ठरणार असल्याचे दिसत आहे.मुख्यमंत्र्यांनी वॉर रुममध्ये नुकतीच गृहनिर्माण विभागाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये गृहनिर्माण विभागामार्फत राज्यात निर्माण होणाऱ्या घरांची माहिती पीपीटीद्वारे मुख्यमंत्र्यांना दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विभागाच्या कारभारावर ताशेरेओढले. सरकारला वर्ष झाले तरी अद्याप एकही घर पूर्ण करत आले नाही, तर दिलेले टार्गेट कधी पूर्ण करणार? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केल्याचे, बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले.म्हाडा, एसआरए मुंबई, एसआरए पुणे, एसआरए पिंपरी-चिंचवड, जवाहरलाल नागरी राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना, २०२२ पर्यंत सर्वांना घर ही योजना, एमआरडीए प्राधिकरणे यांच्यामार्फत २०२० पर्यंत ६ लाख ५८ हजार ४३५ घरे बांधण्यात येणार आहेत. २०१५-१६ या आर्थिक वर्षात या प्राधिकरणांमार्फत ५६ हजार २१५ घरे उभारण्यात येणार आहेत. तसेच २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ लाख ५७ हजार ७७७ घरे निर्माण होणार आहेत. यामध्ये ५० हजार घरे एसआरए मुंबईकडून उपलब्ध होतील, असे नमूद करण्यात आले आहे.२०१७-१८ या आर्थिक वर्षात १ लाख १० हजार ८२१ घरे उपलब्ध होतील. त्यामध्येही ५० हजार घरे मुंबई एसआरएकडून उपलब्ध होणार आहेत, तर म्हाडाकडून २२ हजार ९८४ आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड एसआरएकडून १२ हजार ५०० घरे निर्माण होतील. त्याचप्रमाणे २०१८-१९ या आर्थिक वर्षात १ लाख १० हजार ९७ घरे बांधण्यात येणार आहेत.यापैकी ५० हजार घरे एसआरए मुंबई आणि २३ हजार ५९७ घरे म्हाडाकडून उभारण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात १ लाख ३२ हजार ५७२ घरे उपलब्ध होणार असल्याचे टार्गेट गृहनिर्माण विभागाने निश्चित केले आहे.
६ लाख ५८ हजार घरांचे टार्गेट
By admin | Updated: December 8, 2015 23:46 IST