लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २0१६-१७ या वित्त वर्षात डिजिटल पेमेंटमध्ये (व्यवहार संख्या) ५५ टक्के, तर मूल्याच्या दृष्टीने २४.२ टक्के वाढ झाली आहे. नीती आयोगाचे मुख्य सल्लागार रतन वाटल यांनी ही माहिती दिली. डिजिटल पेमेंटच्या नेमक्या आकड्याबाबत काही टीकाकारांनी संशय व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर वाटल यांचे वक्तव्य आले आहे. नीती आयोगाने डिजिटल पेमेंटबाबत तयार केलेल्या ‘मेजर्स आॅफ डिजिटल पेमेंट्स : ट्रेंड्स, इश्यूज अँड चॅलेंजेस’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी वाटल बोलत होते. फिक्की आणि नीती आयोगाने आयोजित केलेल्या एका परिसंवादात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी सरकारने नोटाबंदी लागू केल्यानंतर डिजिटल पेमेंटला गती मिळाली होती. अलिकडील काही महिन्यांत मात्र ही गती पुन्हा मंदावली आहे. एप्रिलमध्ये १0९.५८ निखर्व रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले. मार्चमध्ये हा आकडा १४९.५८ निखर्व रुपये इतका होता. याचाच अर्थ मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये या व्यवहारांत घट झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, डिजिटल व्यवहारांची संख्याही एप्रिलमध्ये ४.५६ टक्क्यांनी घसरून ८५३.१ दशलक्षांवर आली आहे. मार्चमध्ये ती ८९३.९ दशलक्ष होती. डिसेंबरमध्ये सर्वाधिक ९५७.५ दशलक्ष डिजिटल व्यवहार झाले होते. देशात डिजिटल व्यवहारांना गती मिळावी यासाठी नोटाबंदी करण्यात आल्याचे सरकार सांगते, हे विशेष.निवडक आकडेवारीफिक्कीने एक निवेदन जारी करून वाटल यांच्या भाषणाचा गोषवारा जाहीर केला आहे. त्यानुसार, रिझर्व्ह बँकेची आकडेवारी परिपूर्ण नाही. काही निवडक पेमेंट सिस्टिम इंडिकेटर्सच्या आधारे आकडेवारी तयार केली आहे.
डिजिटल पेमेंटमध्ये ५५% वाढ
By admin | Updated: July 5, 2017 00:40 IST