Join us  

५३८ अंकांची घसरण

By admin | Published: December 17, 2014 1:02 AM

मंगळवारी शेअर बाजारांत प्रचंड पडझड झाली. हा १६ महिन्यांतील सर्वांत वाईट दिवस ठरला

मुंबई : मंगळवारी शेअर बाजारांत प्रचंड पडझड झाली. हा १६ महिन्यांतील सर्वांत वाईट दिवस ठरला असून, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५३८ अंकांनी कोसळून २७ हजारांच्या खाली आला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीआधी विदेशी गुंतवणूकदार द्विधा मन:स्थितीत असल्याने ही घसरण झाली आहे. तेलाच्या घसरलेल्या किमती आणि रशियाने केलेली दरवाढ ही आणखी काही कारणे बाजाराच्या घसरणीला कारणीभूत ठरली.ब्रोकरांनी सांगितले की, काही देशांतर्गत आर्थिक घडामोडींनीही शेअर बाजाराला घसरणीला लावले आहे. वाढलेली व्यापारी तूट आणि घसरलेला रुपया यांचा त्यामध्ये समावेश आहे. या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला महत्त्व दिले. भारतीय रुपयाने ५९ पैशांची घसरण नोंदवून डॉलरच्या तुलनेत ६३.५३ असा नीचांक गाठला आहे. ही रुपयाची १३ महिन्यांतील सर्वाधिक कनिष्ठ पातळी ठरली आहे. ३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी नरमाईनेच उघडला. आशियातील इतर बाजारही नरम असल्यामुळे सेन्सेक्स आणखी खाली जात राहिला. दिवसभर विक्रीचा जोर कायम राहिला. सत्र अखेरीस बाजार २६,७८१.४४ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये ५३८.१२ अंकांची अथवा १.९७ टक्क्यांची घसरण झाली. या आधीची एका दिवसातील सर्वांत मोठी घसरण ३ सप्टेंबर २0१३ रोजी नोंदली गेली होती. त्या दिवशी सेन्सेक्स ६५१.४७ अंकांनी घसरला होता. बाजारात विक्रीचा मारा इतका जबरदस्त होता की, १२ क्षेत्रांपैकी १0 क्षेत्रांचे निर्देशांक घसरले. ही घसरण १.४४ टक्के ते ४.१७ टक्के या दरम्यान होती. धातू, रिअल्टी, एफएमसीजी, बँकिंग, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, आरोग्य आणि ऊर्जा या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसला. रुपयाच्या घसरणीमुळे लाभ होणाऱ्या सॉफ्टवेअर निर्यात करणाऱ्या कंपन्यांचे समभाग वाढले. टेक कंपन्यांनाही लाभ झाला. सेसा स्टरलाईटला सर्वाधिक ७.७७ टक्के घसरण सोसावी लागली. त्यापाठोपाठ डॉ. रेड्डीज लॅबला ६.३२ टक्के, हिंदाल्कोला ५.६७ टक्के आणि एसबीआयला ४.६६ टक्के घसरण सोसावी लागली. टाटा पॉवर, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, एलटीसी, टाटा स्टील, एचडीएफसी यांचे समभागही कोसळले. टीसीएसचे समभाग ३.४0 टक्क्यांनी वाढले. इन्फोसिसला 0.६९ टक्क्यांचा लाभ मिळाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी ८,0५२.६0 पर्यंत खाली घसरला होता. नंतर त्यात थोडी सुधारणा झाली. तरीही सत्रअखेरीस निफ्टी १५२ अंकांची घसरण नोंदवून ८,0६७.६0 अंकांवर बंद झाला. ब्रोकरांनी सांगितले की, शेअर बाजाराची गणिते केव्हा फिरतील काहीच सागंता येत नाही. खरे म्हणजे भारतातील महागाईचा दर घसरला आहे. त्यामुळे व्याजदर कपातीला वाव निर्माण झाला आहे. अशा आश्वासक वातावरणात बाजार कोसळत आहे. (वृत्तसंस्था)