Join us

अक्कलकोट तालुक्यातील 37 रेशन दुकानांचे परवाने रद्द

By admin | Updated: July 1, 2014 22:08 IST

पुरवठा अधिकारी चव्हाण: अनेक राजकीय लोकांची ‘दुकानदारी’ बंद

पुरवठा अधिकारी चव्हाण: अनेक राजकीय लोकांची ‘दुकानदारी’ बंद
सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील रेशन दुकाने ही राजकारण्यांचे ‘कुरण’ बनल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या या दुकानदारांची सुनावणी घेऊन तब्बल 37 रेशन दुकानांचे परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण यांनी कायमचे बंद केले आहेत़
ऑक्टोबर 2013 मध्ये जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी प्रत्येक तहसीलदारांना रेशन दुकानांचे परवाने तपासण्याचे आदेश दिले होत़े अक्कलकोटचे तत्कालीन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी अक्कलकोट तालुक्यातील 44 रेशन दुकानांची तपासणी केली हेाती़ बोगस धान्य वाटप, धान्यामध्ये अफरातफर, जादा दराने धान्य विक्री आदी सात प्रकारच्या तक्रारी होत्या़ त्यामुळे या सर्व रेशन दुकानांचे दफ्तर जप्त करुन मंडल अधिकारी आणि तलाठय़ांच्या पथकाने तपासणी करुन जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर केला होता़ त्यानुसार अक्कलकोट पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी अहवाल फेब्रुवारी 2014 रोजी अक्कलकोट पोलीस ठाण्याकडे दिला होता; मात्र कोणतीही कारवाई झाली नाही़
यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार त्या 44 रेशन दुकानदारांची सुनावणी पुरवठा अधिकारी चव्हाण यांनी 10 दिवसांपूर्वी घेतली़ यापैकी 7 जणांचे म्हणणे समाधानकारक वाटल्यामुळे उर्वरित 37 जणांचे परवाने कायमचे रद्द केले आहेत़
कोट़़
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी परिसरातील 44 रेशन दुकानांच्या तक्रारी होत्या, सर्व दफ्र तपासून सुनावणी घेऊन 37 दुकानांचे परवाने रद्द केले आहेत़ शेजारील दुकानांना हा तात्पुरता परवाना दिला असून लवकरच प्रसिद्धीकरण करुन रेशन दुकानांचे नवे परवाने दिले जातील़
रमेश चव्हाण
जिल्हा पुरवठा अधिकारी
चौकट़़़
येथील परवाने झाले रद्द
दुधनी 8, मैंदर्गी 7, बोरोटे 1, उडगी 2, इब्राहिमपूर 2, आंदेवाडी, हालहाळी, सलगर, संगोगी, नागारे, भोसगे, चिक्केहळ्ळी, बिंजगेरी, चिंचोळी, हत्तीकणबस, बबलाद, बासलेगाव, जकापूर, कल्लप्पावाडी, परमतांडा.