२५० सफाई कामगार वार्यावर
By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST
महापालिकेची आश्वासने हवेत : संपाच्या वेळी केले होते शहर स्वच्छ
२५० सफाई कामगार वार्यावर
महापालिकेची आश्वासने हवेत : संपाच्या वेळी केले होते शहर स्वच्छ...ठाणे - घंटागाडीवर काम करणार्या सफाई कामगारांनी मागील वर्षी किमान वेतनासाठी केलेल्या संपाच्या काळात महापालिकेने पर्यायी २५० कामगार घेतले होते आणि संप मोडीत काढला होता. या कामगारांना कंत्राटी सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, वर्ष उलटूनही यातील एकाही कामगाराला सेवेत घेतले नसल्याची बाब समोर आली आहे.घंटागाडीवर काम करणार्या सुमारे १४०० कामगारांनी गेल्या वर्षी किमान वेतनासाठी एक महिन्याहून अधिक काळ संप पुकारला होता. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी कचर्याचे ढिगारे साचले होते. तसेच आरोग्याच्या समस्यासुद्धा निर्माण झाल्या होत्या. यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने अखेर पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी शहरातील कचरा उचलण्यासाठी दोन दिवसांत २५० पयार्यी कामगार सेवेत घेतले होते. त्यांना पुढेही सेवेत कायम ठेवले जाईल, असे आश्वासन दिले होते. या वेळी या कर्मचार्यांनी कचरा उचलून शहर स्वच्छ केले आणि संप मोडीत काढला. त्यानंतर, त्यांना एक महिन्याचे मानधनही देण्यात आले. संप संपला आणि कर्मचारी पुन्हा सेवेत दाखल झाले. परंतु, त्याच वेळी महापालिकेच्या अडचणीच्या काळात शहर स्वच्छ करणार्या कामगारांना मात्र पालिकेने अडगळीत टाकले. एक वर्ष उलटून गेले तरीही या कर्मचार्यांना सेवेत न घेतल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटला आहे. कर्मचार्यांवर अन्याय केल्याचा आरोप मातंग समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रमेश धोडके यांनी केला आहे. महापालिका केवळ आश्वासन देत आहे, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र करत नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. ....महापालिकेत जे काम उपलब्ध होईल, ते त्यांना करावे लागेल, असे ठरले होते. त्यानुसार, काही कर्मचार्यांनी कामा सुरू केले आहे. परंतु, काही कर्मचारी आम्हाला हे काम नको, ते हवे आहे, अशी भूमिका घेत आहेत. त्यांना पर्याय देता येऊ शकणार नाही. - संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा