Join us

कागल तालुक्यात २१ लाख टन उसाची उपलब्धता

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST

जिल्हा, सीमाभागातील तोडणी यंत्रणा कार्यरत

जिल्हा, सीमाभागातील तोडणी यंत्रणा कार्यरत
कागल : सध्या सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामासाठी कागल तालुक्यातील चार साखर कारखान्यांबरोबर जिल्‘ातील आणि सीमाभागातील साखर कारखाने ऊस तोडणीसाठी कागल तालुक्यात मोठी यंत्रणा राबवित आहेत. तालुक्यात जवळपास २१ लाख टन ऊस या हंगामात उपलब्ध असून, भौगोलिक क्षेत्राचा विचार करता ही उसाची उपलब्धता कारखान्यासाठी दिलासादायक आहे.
तालुक्यात २१ हजार ११४ हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. सरासरी हेक्टरी १०० टन उसाचे उत्पादन गृहीत धरता २१ लाख टन ऊस साखर कारखान्यांना मिळेल. यामध्ये छ. शाहू साखर कारखाना, सदाशिवराव मंडलिक, संताजी घोरपडे साखर कारखाना हे तीन साखर कारखाने ऊस उचल करण्यात अग्रभागी असतील. सात ते साडेसात लाख टन उसाचे उद्दिष्ट लक्षात घेता या कारखान्यांना तालुक्यातून प्रत्येकी पाच ते सहा लाख टनांपर्यंत ऊस उपलब्ध होण्यास कोणतीच अडचण नाही. उर्वरित उसासाठी कर्नाटक सीमाभाग आणि जिल्‘ातील इतर क्षेत्रांत त्यांना यंत्रणा राबविता येते. शाहू साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र तर करवीर तालुक्यातील काही गावे आणि निपाणी, चिकोडी (कर्नाटक) तालुके असे आहे. घोरपडे कारखान्याचा हा पहिलाच गळीत हंगाम असल्याने त्यांचे उद्दिष्ट इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी असेल. बिद्री कारखान्याचे कार्यक्षेत्र तालुक्यात कमी आहे. तरीही ते दीड लाख टनांपर्यंत उसाची उचल करण्याचा प्रयत्न करतील. याशिवाय पंचगंगा (इचलकरंजी), राजाराम (कोल्हापूर), यांचेही सभासद शेतकरी या तालुक्यातून सुरुवातीपासून आहेत. हालसिद्धनाथ (निपाणी), बेडकीहाळमधील व्यंकटेश्वरा, दालमिया शुगर, जवाहर (हुपरी), गडहिंग्लज, आजरा असे साखर कारखानेही तालुक्यातील ऊस उचलतील. मात्र, त्यांना यावर्षी प्रतिसाद फारसा मळेल, असे चित्र नाही.
-------------
चौकट:
६२ टक्के क्षेत्र सिंचनासाठी
तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५४ हजार ९१२ हेक्टर इतके आहे. त्यामध्ये शेतीसाठी ४६ हजार ४४७ हेक्टर क्षेत्र उपयोगात आणले जाते. तालुक्यातील सर्व नेतेमंडळींनी राजकारण करतानाच तालुक्याच्या विकासाकडेही पुरेसे लक्ष दिल्याने जवळपास ६२ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. केवळ डोंगर कपारीचीच जमीन ओलिताखाली नाही. त्यामुळे अजूनही प्रयत्न झाले, तर सिंचनाचे क्षेत्र वाढून उसाच्या क्षेत्राची वाढ होऊ शकते.
-----------------
तालुक्यात ऊस पिकाचीच मक्तेदारी
१९९८ मध्ये सर्वसाधारणपणे नऊ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस पिक घेतले जात होते. ते वाढत जाऊन आज २१ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. या चालू रब्बी हंगामातील नोंदणी बघता ज्वारी ६०३ हेक्टर, गहू ५४ हेक्टर, हरभरा ६५ हेक्टर, भाजीपाला २९४ हेक्टर, तंबाखू १२५९ हेक्टर, फळबाग ५० हेक्टर क्षेत्रांत आहेत. तर ग्रीन हाऊस दोन हेक्टर क्षेत्रांत आहेत. सेडनेट हाऊस ३० गुंठ्यात आहे. म्हणजे ऊस पिकाचीच मक्तेदारी आहे. ती टिकविण्याचे काम साखर कारखान्यांना करावे लागेल.
--------------------
तालुक्यातील ऊस पिकाची कारणे
* भौगोलिक क्षेत्र, हवामान आणि पाण्याची उपलब्धता
* साखर कारखान्यांचा उसाला चांगला दर
* तालुक्यातील साखर कारखान्यांनी ठेवलेले चोख आर्थिक व्यवहार
* शेतकर्‍यांना दिलेल्या सेवा-सुविधा आणि प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन