Join us  

परवडणा-या घरांच्या प्रकल्पांसाठी एसबीआय उभारणार २0 हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 1:56 AM

परवडणारी घरे आणि पायाभूत प्रकल्पांना अर्थपुरवठा करता यावा यासाठी २0 हजार कोटी रुपयांचे भांडवल उभे करण्याचा निर्णय स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) घेतला आहे

नवी दिल्ली : परवडणारी घरे आणि पायाभूत प्रकल्पांना अर्थपुरवठा करता यावा यासाठी २0 हजार कोटी रुपयांचे भांडवल उभे करण्याचा निर्णय स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) घेतला आहे. बँकेने मुंबई शेअर बाजारात सादर केलेल्या नियामकीय दस्तावेजात ही माहिती दिली.

प्राप्त माहितीनुसार, एसबीआयच्या केंद्रीय बोर्डाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा निधी रोख्यांच्या माध्यमातून उभा करण्यात येणार आहे, देशात तसेच विदेशी बाजारात हे रोखे विकले जातील. पायाभूत सुविधा आणि परवडणाºया घरांना अर्थसाह्य करणे या मुख्य उद्देशाने हा निधी उभारण्यात येत आहे.

२0१७-१८ आणि २0१८-१९ या वर्षांत हा निधी उभारला जाईल. हा निधी भारतीय रुपयात असेल की विदेशी चलनात याचे स्पष्टीकरण मात्र बँकेने दिले नाही. याआधी या महिन्याच्या सुरुवातीला एसबीआयने २ अब्ज डॉलरचे रोखे जारी करण्याची घोषणा केली होती. विदेशातील विस्तारासाठी असलेला हा निधी अमेरिकी डॉलर आणि अन्य रूपांतरणीय चलनात उभा केला जाईल. सार्वजनिक प्रस्ताव अथवा खासगी सिनिअर अनसेक्युअर्ड नोट्सच्या माध्यमातून हे रोखे जारी केले जातील, असे बँकेने म्हटले होते.

रिअल इस्टेट क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून मंदी सुरू आहे, गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने परवडणाºया किमतीतील घरांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या घरांची मागणी वाढली आहे. मंदीच्या काळात अशा प्रकारे मागणी वाढणे भांडवल पुरवठा करणाºया संस्थांसाठी चांगली संधी आहे. ही संधी टिपण्यासाठी एसबीआयने मोठे भांडवल उभारण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.स्वस्त घरे खरेदी करणाºया खरेदीदारांना सरकार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व्याजावर सबसिडी देते. याचा लाभ बँकांनाही होत आहे. भांडवल पुरवठा वाढविण्यासाठी एचडीएफसी बँकेने एचडीएफसी कॅपिटल अ‍ॅडव्हायजर्सच्या माध्यमातून दुसरा स्वस्त गृहनिर्माण निधी नुकताच जारी केला. त्यातून १ अब्ज डॉलर बँकेने उभे केले आहेत.