Join us  

विमान भाड्याला घालणार २0 हजारांची मर्यादा!

By admin | Published: December 26, 2014 1:11 AM

विमान भाड्यांचे नियमन करण्याचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावानुसार, विमानाच्या इकॉनॉमी

नवी दिल्ली : विमान भाड्यांचे नियमन करण्याचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावानुसार, विमानाच्या इकॉनॉमी क्लासच्या एकमार्गी भाड्यास २0 हजार रुपयांची कमाल मर्यादा घालून दिली जाणार आहे. याचाच अर्थ कोणतीही विमान कंपनी इकॉनॉमी क्लाससाठी २0 हजार रुपयांपेक्षा जास्त एकमार्गी भाडे घेऊ शकणार नाही. कमाल मर्यादेप्रमाणेच विमान भाड्याला किमान मर्यादा घालून देण्याचाही सरकारचा विचार आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास कंपन्यांना ठराविक किमान मर्यादेपेक्षा कमी भाड्यात विमान तिकीट विकता येणार नाही. विमान कंपन्यांची स्पर्धा निकोप असावी, या उद्देशाने किमान मर्यादेचा नियम करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वस्त विमान सेवा पुरविणाऱ्या स्पाईसजेट कंपनीच्या आर्थिक संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारने हा प्रस्ताव आणला आहे. आर्थिक संकटामुळे स्पाईसजेटला आपली अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागली होती. या संधीचा फायदा घेऊन इतर विमान कंपन्यांनी विमान भाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ केली. ऐन सुटीच्या काळात ही वाढ झाल्याने नागरिकांना मोठा भुर्दंड सोसावा लागला. असे पुन्हा घडून येऊ नये, यासाठी सरकार आता विमान कंपन्यांना भाडेमर्यादा ठरवून देणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने यासंबंधीची नोटही तयार केली आहे. अव्वाच्या सव्वा भाड्यावर खासदार, टूर आॅपरेटर आणि प्रवाशांनी तीव्र टीका केली आहे, असे नोटमध्ये म्हटले आहे. एका विमान कंपनीच्या सीईओने सांगितले की, या निर्णयाने आणखी विमान कंपन्या बंद पडतील.