नवी दिल्ली: देशाच्या बऱ्याच भागात मोसमी पाऊस अद्याप पोहोचला नसल्याच्या पार्श्वभूमीवर खरिप पिकांवर होऊ शकणारा परिणाम लक्षात घेऊन, तसेच भाववाढ नियंत्रणात ठेवण्याचा उपाय म्हणून केंद्रीय साठ्यातील १०० लाख टनांहून अधिक गहू चालू वित्तीय वर्षात खुल्या बाजारासाठी उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. खुला बाजार विक्री योजनेनुसार (ओएमएसएस) हा गहू घाऊक औद्योगिक ग्राहकांना विकला जाईल.केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव सुधीर कुमार यांनी टिष्ट्वटरवर ही माहिती दिली. मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बाजारात पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी यंदाच्या वर्षात सरकार केंद्रीय साठ्यातून १०० लाख टनापर्यंत गहू खुल्या बाजारात उपलब्ध करून देईल. सध्या पंतप्रधान विदेशात असल्याने पुढील बुधवारी हा विषय मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी नेला जाईल, असेही हा अधिकारी म्हणाला.सरकारकडे कोणत्याही वेळी किमान १७.१ दशलक्ष टन गव्हाचा ‘बफर स्टॉक’ असावा, असा नियम आहे. त्या तुलनेत १ जुलै रोजी सरकारकडे ३९.८ दशलक्ष टन गव्हाचा साठा होता. भारतीय अन्न महामंडळाचा एक अधिकारी म्हणाला की, आमच्याकडे पुरेसा साठा असल्याने यंदा १०० लाख टन गहू खुल्या बाजारासाठी देण्यास काहीच अडचण येऊ नये.(लोकमत न्यूज नेटवर्क)
१०० लाख टन गहू बाजारात विकणार
By admin | Updated: July 17, 2014 00:16 IST