Join us  

Mutual Funds मध्ये गुंतवणूक किती कालावधीसाठी करायची?... समजून घ्या सोपा फंडा

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 11, 2023 11:39 AM

म्युच्युअल फंडमध्ये जसजशी गुंतवणूक वाढत जाते तसतशी मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात रक्कम येत राहते. यामुळे जितका कालावधी अधिक तितका नफा अधिक हाच म्युच्युअल फंड्सचा अचूक फंडा असतो.

>> डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक

म्युच्युअल फंड्स चे जग विस्तारात आहे. विशेषतः तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित झाली आहे आणि होत आहे. म्युच्युअल फंड्स सही है अशी जाहिरात आपण नेहमी पाहत असतो. गुंतवणूक आणि वेल्थ क्रिएशन यासाठी म्युच्युअल फंड एक उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणून त्याकडे भारतीय गुंतवणूकदार पाहत आहेत. भारतीय म्युच्युअल फंड असेट व्यवस्थापन आता रुपये ४७ लाख कोटींच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. भारतात एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात पैसे गुंतविणाऱ्यांची खाते संख्या तब्बल ७ कोटींच्या घरात आली आहे. अशा व्यापक आणि वाढणाऱ्या म्युच्युअल फंड वित्तीय व्यवस्थेचे आपण एक भाग आहात का? म्युच्युअल फंड म्हणजे नेमके काय हे आपल्याला माहीत आहे का? म्युच्युअल फंड माध्यमातून आपले गुंतविलेले पैसे पुढे नेमके कुठं गुंतविले जातात? म्युच्युअल फंड मधील गुंतवणूकदारांना नेमका फायदा कसा होतो? एनएव्ही म्हणजे काय? आपल्याला रक्कम पाहिजे तेव्हा काढता येते का? म्युच्युअल फंडमध्ये रिस्क फॅक्टर किती? गुंतविलेल्या पैशांची सुरक्षितता किती?  इतर गुंतवणुकीच्या तुलनेत यात फायदा नेमका कसा? म्युच्युअल फंड्सचे नेमके प्रकार किती आणि कोणते? विविध फंड्सची कामगिरी नेमकी कशी आहे? यावर अधिक तपशीलाने जाणून घ्या 'वर्ल्ड ऑफ म्युच्युअल फंड्स' या डॉ. पुष्कर कुलकर्णी यांच्या विशेष लेखमालेतून... 

फंडा म्युच्युअल फंड्सचा...

म्युच्युअल हा इंग्रजी शब्द आहे. याचा मराठीत अर्थ परस्पर किंवा एकत्रित स्वरूपात असा आहे. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात आपली रक्कम एकरकमी किंवा महिन्यातून एकदा ठरावीक प्रमाणानुसार (एसआयपी) गुंतवीत असतात.  फंड व्यवस्थापन एकत्रित जमलेली मोठी रक्कम पुढे गुंतवित असते किंवा ठराविक उद्देश साध्य झाल्यावर काढत असतात. म्युच्युअल फंड्सचे प्रकार विविध आहेत. आपण ते सविस्तर पुढे जाणून घेणार आहोतच. यात इक्विटी फंड मोठ्या प्रमाणात आहे. यातील रक्कम थेट शेअर मार्केटमध्ये जाते. म्युच्युअल फंडमध्ये जसजशी गुंतवणूक वाढत जाते तसतशी मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात रक्कम येत राहते. यामुळे जितका कालावधी अधिक तितका नफा अधिक हाच म्युच्युअल फंड्सचा अचूक फंडा असतो. यामुळे यातील गुंतवणूक शक्यतो दीर्घकाळ असावी. वेल्थ क्रिएशनसाठी म्युचुअल फंड हा एक अचूक फंडा समजायला हरकत नाही. विनाउद्देश म्युच्युअल फंड्समध्ये रक्कम अजिबात गुंतवू नका.

या उद्देशाने करा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुक

म्युच्युअल फंड्स मधील गुंतवणूक करताना आपले उद्दिष्ट स्पष्ट हवे. खालीलपैकी एक किंवा अनेक उद्देश ठरवून गुंतवणूक सुरू करू शकता.

१. रिटायरमेंट नियोजन - यात गुंतवणूक कालावधी किमान २० वर्षे किंवा अधिक असावा.२. मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षण खर्च - याचा कालावधी किमान १० ते १५ वर्षांचा असावा.३. मुलगा किंवा मुलगी लग्न खर्च - याचा कालावधी किमान १० वर्षांचा असावा.४. नवीन मोठे घर खरेदी - याचा कालावधी किमान १० वर्षांचा असावा.५. मोटार कार खरेदी किंवा बदलून नवीन घेणे - याचा कालावधी किमान ५ वर्षांचा असावा.६. परदेश सहल - याचा कालावधी किमान ४ ते ५ वर्षांचा असावा.

वरील व्यतिरिक्त इतरही उद्देश असू शकतात. विना उद्देश म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करू नका. गुंतवणुकीत सातत्य ठेवा. गुंतवणुकीची जोखीम लक्षात घेता जो किमान कालावधी दिला आहे त्यानुसार प्रत्येक महिन्याला बचत सुरू करा. अपेक्षित खर्चाची रक्कम किती आहे, याचा विचार करून एकूण किमान वर्षांनुसार गुंतवणुकीची रक्कम ठरवावी. हा म्युच्युअल फंडचा फंडा ज्यास समजला अशा गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड खरोखरच सही है.

पुढील भागात जाणून घेऊ, म्युच्युअल फंड्सचे विविध प्रकार आणि त्या चालवणाऱ्या संस्था...

टॅग्स :गुंतवणूक