Impressions on exporters across the country; GST claims worth Rs 10 crore revealed | देशभर निर्यातदारांवर छापे; जीएसटीचे ४७0 कोटी रुपयांचे बोगस दावे उघड
देशभर निर्यातदारांवर छापे; जीएसटीचे ४७0 कोटी रुपयांचे बोगस दावे उघड

नवी दिल्ली : निर्यातदार आणि त्यांच्या पुरवठादारांवर देशभरातील ३३६ ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांतून एकात्मिक वस्तू व सेवाकराचे (आयजीएसटी) ४७0 कोटी रुपयांचे बनावट दावे (क्लेम) उघडकीस आले आहेत. ३,५00 कोटींची बनावट बिलेही या कारवाईत जप्त करण्यात आली आहेत.

महसूल गुप्तचर महासंचालनालय आणि जीएसटी गुप्तचर महासंचालक यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईत सुमारे १,२00 अधिकारी सहभागी झाले होते. छाप्यात असे आढळून आले की, काही निर्यातदार आयजीएसटी पेमेंटवर वस्तूंची निर्यात करीत होते,
तसेच इनपूट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घेत होते. कर देयता समायोजित करताना आयटीसीचा लाभ घेणे चूक नाही. तथापि, काही निर्यातदार बनावट पुरवठा दाखवून आयटीसी लाभ मिळवीत होते, असे छाप्यांत आढळून आले. निर्यातीवरील आयजीएसटी पेमेंट परताव्याच्या (रिफंड) स्वरूपात परत मिळवायचे असते. हाती आलेल्या कागदपत्रांच्या आधारे तपास संस्था आता सुमारे ४५0 कोटी रुपयांच्या आयजीएसटी परताव्यांची तपासणी करीत आहेत.

१५ राज्यांत घातल्या धाडी
बुधवारी ही छापेमारी करण्यात आली. ही मोहीम तब्बल १५ राज्यांत राबविली गेली. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, प. बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगड या राज्यांचा त्यात समावेश आहे. जीएसटी आणि प्राप्तिकर विवरणपत्रांची पडताळणी केल्यानंतर, ही फसवाफसवी सरकारच्या लक्षात आली होती.

Web Title: Impressions on exporters across the country; GST claims worth Rs 10 crore revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.