IndiGo refunds : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोमध्ये मोठ्या प्रमाणात सेवा विस्कळीत झाली. परिणामी देशभरात विमानांची उड्डाणे रद्द झाली. अनेक मार्गांवरील हवाई भाड्यामध्ये अचानक मोठी वाढ झाली. परिस्थिती बिघडल्याचे पाहून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप केला आहे. सरकारने शनिवारी देशांतर्गत इकोनॉमी तिकिटांवर भाड्याची कमाल मर्यादा निश्चित केली आहे, जेणेकरून एअरलाइन्स प्रवाशांकडून मनमानी किमती वसूल करू शकणार नाहीत.
यासोबतच, सरकारने इंडिगो आणि इतर एअरलाइन्सला कडक निर्देश दिले आहेत की, रद्द झालेल्या किंवा सेवा बाधित झालेल्या सर्व विमानांचे रिफंड कोणत्याही परिस्थितीत आज, रविवार (७ डिसेंबर) रात्री ८ वाजेपर्यंत प्रवाशांना परत करावेत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.
हवाई भाड्याची कमाल मर्यादा निश्चित
सरकारी आदेशानुसार, एअरलाइन्स आता प्रवासाच्या अंतरावर आधारित इकोनॉमी वर्गाच्या तिकिटांवर कमाल इतकेच भाडे आकारू शकतील.
| प्रवासाचे अंतर | तिकिटाची कमाल किंमत (रुपये) |
| ५०० किमी पर्यंत | ७,५०० |
| ५०० ते १,००० किमी | १२,००० |
| १,००० ते १,५०० किमी | १५,००० |
| १,५०० किमी पेक्षा जास्त | १८,००० |
जोपर्यंत हवाई भाडे सामान्य होत नाही किंवा सरकार नवीन आढावा घेत नाही, तोपर्यंत ही नवीन मर्यादा लागू राहील.
ही मर्यादा एअरलाइनच्या वेबसाइटवरून किंवा कोणत्याही ऑनलाइन एजंटकडून घेतलेल्या सर्व प्रकारच्या बुकिंगवर लागू होईल.
सरकारने स्पष्ट केले आहे की, ही मर्यादा केवळ मूळ भाड्यावर लागू असेल आणि इतर शुल्क (उदा. टॅक्स) यात समाविष्ट नाहीत. बिझनेस क्लास आणि उडान योजनेंतर्गत येणाऱ्या विमानांना हे नियम लागू नाहीत.
आज रात्री ८ वाजेपर्यंत रिफंडचा अल्टिमेटम
- नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने इंडिगोला सर्व प्रलंबित प्रवाशी रिफंड त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.
- रद्द झालेल्या किंवा सेवा बाधित झालेल्या विमानांचे रिफंड आज, रविवार (७ डिसेंबर) रात्री ८ वाजेपर्यंत प्रवाशांना परत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे.
- ज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली आहेत, त्यांच्याकडून तिकिट बदलण्यासाठी किंवा रीशेड्यूलिंगसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही, असेही एअरलाइन्सना सांगण्यात आले आहे.
- रिफंडमध्ये विलंब झाल्यास किंवा नियमांचे पालन न झाल्यास तातडीने आणि कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मंत्रालयाने दिला आहे.
इंडिगोची स्थिती
इंडिगोची अजूनही अनेक उड्डाणे रद्द होत आहेत, मात्र शुक्रवारी रद्द झालेल्या १,००० हून अधिक उड्डाणांच्या तुलनेत शनिवारी ही संख्या ८५० पेक्षा कमी झाली आहे. सर्वाधिक परिणाम दिल्ली (१०६ उड्डाणे), बंगळूर (१२४) आणि मुंबईत (१०९) दिसून आला.
वाचा - 'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, परिस्थिती सामान्य स्थितीत आणण्यासाठी सर्वोतरी प्रयत्न करत आहेत. पुढील काही दिवसांत परिस्थिती हळूहळू सुधारेल, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.
