Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऐन मंदीच्या काळातही सोने-चांदीच्या दरात वाढ; काय आहेत आजचे दर?

ऐन मंदीच्या काळातही सोने-चांदीच्या दरात वाढ; काय आहेत आजचे दर?

लग्नसराईच्या तुलनेत सोने तीन हजारांनी, तर चांदी चार हजारांनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 05:59 AM2021-07-26T05:59:44+5:302021-07-26T06:00:57+5:30

लग्नसराईच्या तुलनेत सोने तीन हजारांनी, तर चांदी चार हजारांनी वाढली

Gold-silver prices rise even during Ain recession; What are today's rates? | ऐन मंदीच्या काळातही सोने-चांदीच्या दरात वाढ; काय आहेत आजचे दर?

ऐन मंदीच्या काळातही सोने-चांदीच्या दरात वाढ; काय आहेत आजचे दर?

Highlightsगेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग पसरला आणि सराफ व इतर व्यवसायांवर बंधने आली. अक्षयतृतीया, १४ मे रोजी सोने ४७ हजार ७०० रुपये होते.चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये देशात झालेली सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

जळगाव : एरव्ही लग्नसराईनंतर जुलै महिन्यापासून घसरण होणाऱ्या सोने-चांदीच्या भावात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वाढ होत आहे. लग्नसराईचा काळ असलेल्या एप्रिल महिन्यात ४६ हजार १०० रुपये प्रति तोळा असलेला सोन्याचा भाव सध्या ४९ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. अशाच प्रकारे चांदीचा भावदेखील ६६ हजारांवरून ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
सोने-चांदीचे भाव दरवर्षी साधारण नवरात्रोत्सवापासून वाढण्यास सुरुवात होऊन लग्नसराई अर्थात मे-जून महिन्यापर्यंत अधिक असतो. त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिना हा सराफ बाजारात मंदीचा काळ समजला जातो. मात्र, गेल्या वर्षीपासून जुलै महिन्यात सोने-चांदीचे भाव वाढत आहेत.

गुंतवणूक वाढीचा परिणाम
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग पसरला आणि सराफ व इतर व्यवसायांवर बंधने आली. सर्वच व्यवसाय मंदावत असताना सोने-चांदीत गुंतवणूक वाढू लागली व या मौल्यवान धातूचे भाव वाढू लागले. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सोने ४७ हजार रुपये प्रति तोळ्यावर होते. त्यानंतर जुलै २०२० मध्ये हे भाव ५३ हजार ५०० रुपयांवर पोहोचले होते. अशाच प्रकारे एप्रिल २०२० मध्ये ४२ हजार १०० रुपयांवर असलेली चांदी जुलै २०२० मध्ये ६७ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली होती.

अक्षयतृतीयेपेक्षा अधिक भाव
गेल्या वर्षी मंदीच्या काळात भाववाढ झाल्यानंतर यंदाही तशीच स्थिती आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात ४६ हजार १०० रुपये प्रति तोळा असलेल्या सोन्याच्या भावात दोन हजार ९०० रुपयांची वाढ होऊन ते ४९ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. अक्षयतृतीया, १४ मे रोजी सोने ४७ हजार ७०० रुपये होते. या मुहूर्ताच्या काळापेक्षा जुलै महिन्यात सोने वधारले आहे. अशाच प्रकारे एप्रिल महिन्यात ६६ हजार १०० रुपये प्रति किलोवर असलेली चांदी सध्या ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

पहिल्या तिमाहीत वाढली सोन्याची आयात
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये देशात झालेली सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या काळामध्ये ७.९ अब्ज डॉलरचे सोने देशामध्ये आले आहे. असे असले तरी चांदीच्या आयातीमध्ये मात्र घट झाली असून, ती ६८.८ कोटी डॉलरपर्यंत कमी झाली आहे. मागील वर्षी कोरोनाच्या कडक लॉकडाऊनमुळे देशामधील सोने व चांदीची आयात थंडावली होती. त्यामुळे यावर्षी त्यामध्ये किती वाढ झाली, ते समजू शकलेले नाही. भारत हा जगातील सर्वात मोठा आयातदार देश आहे. दरवर्षी देशामध्ये ८०० ते ९०० टन सोन्याची आयात केली जाते. 

डॉलर वधारण्यासह खरेदी अधिक
सध्या अमेरिकन डॉलरचे दरदेखील वाढत जाऊन ७४.४३ रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सोने-चांदीचे भाव तर वाढतच आहेत, शिवाय कोरोनामुळे सोने-चांदीत गुंतवणुकीकडे कल वाढत असल्याने ही भाववाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Gold-silver prices rise even during Ain recession; What are today's rates?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं