Gold price reaches 55,000 threshold; Silver is cheaper by Rs 1,300 | बापरे! सोन्याचे भाव पोहोचले ५५ हजारांच्या उंबरठ्यावर; तर चांदी १३०० रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

बापरे! सोन्याचे भाव पोहोचले ५५ हजारांच्या उंबरठ्यावर; तर चांदी १३०० रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : मागणी वाढण्यासह जागतिक पातळीवर सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने बुधवारी एकाच दिवसात सोन्याच्या भावात पुन्हा  १४०० रुपयांनी वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे सोने ५४ हजार ९०० रुपये प्रतितोळा होऊन ५५ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. मंगळवारी मोठी भाववाढ झालेल्या चांदीत मात्र १३०० रुपयांनी घसरण होऊन ती ६६ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे. दलालांनी चांदीपेक्षा सोन्याकडे कल वाढविल्याने हा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या स्थितीमुळे विदेशी बँकांनी व्याजदर घटविल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढल्याचे गेल्या काही दिवसांपासून चित्र आहे.  या धातूंमधील वाढती गुंतवणूक पाहता दलाल अधिक सक्रिय झाल्याने जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये उलाढाल वाढली आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याचे नवनवे विक्रम
जुलैच्या पहिल्या आठवड्यात सोने ४९,२०० वर होते. त्यानंतर १४ रोजी सोन्याचे भाव ८०० रुपयांनी वाढून  ते ५० हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर २१ रोजी पुन्हा एक हजाराने वाढ झाली व ते ५१ हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. त्यानंतर २८ रोजी अडीच हजार रुपयांनी वाढ होऊन ते ५३ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. आता बुधवार २९ जुलै रोजी तर एकाच दिवसात त्यात आणखी १४०० रुपयांची वाढ झाली व सोने ५५ हजारांच्या उंबरठ्यावर येऊन ५४ हजार ९०० रुपये प्रतितोळा झाले आहे.

चांदीमध्ये अनेक दिवसांनंतर घसरण
चांदीमध्येदेखील गेल्या अनेक दिवसंपासून वाढ सुरू आहे. ७ जुलै चांदी ५०,५०० वर होती. त्यानंतर १४ रोजी चांदीच्या भावात ३ हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ५४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली होती. त्यात २१ जुलै रोजी आणखी सहा हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ६० हजारांच्याही पुढे गेली  व ६० हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. २८ रोजी थेट सात हजार रुपये प्रति किलोने वाढ होऊन ती ६७ हजार ५०० रुपयांवर पोहोचली होती. मात्र दलालांनी चांदीपेक्षा सोन्यात अधिक गुंतवणूक वाढविल्याने बुधवार, २९ जुलै रोजी चांदीत १३०० रुपयांची घसरण होऊन ती ६६ हजार २०० रुपयांवर आली. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या चांदीमध्ये अनेक दिवसांनंतर घसरण झाली.
 
अशीच स्थिती राहिल्यास दिवाळीमध्ये सोने ६१ हजारांवर जाणार
जागतिक पातळीवर सोने खरेदीची अशीच स्थिती व अशीच भाववाढ होत राहिल्यास दिवाळीमध्ये सोने ६१ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचेल, असे संकेत दिले जात आहे.

------------------

जागतिक पातळीवर सोन्याची खरेदी वाढतच असल्याने सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहे. मागणी जास्त व आवक कमी अशी स्थिती असल्याने मोठी भाववाढ होत आहे.
- सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gold price reaches 55,000 threshold; Silver is cheaper by Rs 1,300

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.