The fast environment prevails; Moving to the new uppercase | तेजीचे वातावरण कायम; नव्या उच्चांकाकडे वाटचाल
तेजीचे वातावरण कायम; नव्या उच्चांकाकडे वाटचाल

देशामध्ये स्थिर सरकार अधिकारावर आल्याच्या आनंदामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी असतानाही भारतीय बाजारामध्ये तेजीचे वारे वाहताना दिसून आले आहेत. परकीय, तसेच देशी वित्तसंस्था आणि गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या खरेदीच्या बळावरच बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांकाकडे वाटचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे. आगामी काही काळ बाजारात तेजीचा वावर कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहात तेजी दिसून आली. सप्ताहाचा प्रारंभ वाढीव पातळीवर करणारा संवेदनशील निर्देशांक सप्ताहामध्ये ४०,१२२.३४ ते ३९,३५३.१६ अंशांदरम्यान फिरत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो ३९,७१४.२० अंशांवर बंद झाला. सप्ताहामध्ये त्यामध्ये २७९.४८ अंश म्हणजे ०.७ टक्कयांनी वाढ झाली.

राष्ट्र्रीय शेअर बाजारातही तेजीचे वातावरण राहिले. व्यापक पायावर आधारलेल्या येथील निर्देशांकाने (निफ्टी) ०.६ टक्के वाढ नोंदविली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ७८.७० अंशांनी वाढून ११,९२२.८० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकामध्येही वाढ बघावयास मिळाली. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप निर्देशांक १५ हजारांचा टप्पा पार करून गेला. हा निर्देशांक १५०.९४ अंश म्हणजेच १.०१ टक्क्यांनी वाढून १५,०९६.१८ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅपमध्ये १.१४ टक्के वाढ झाली. तो १६७.४८ अंशांनी वर जाऊन १४,८६७.०४ अंशांवर बंद झाला. अमेरिका आणि चीनदरम्यानच्या व्यापार युद्धातील तणाव वाढत असून, त्यामुळे जगभरातील शेअर बाजारात मंदी आहे. शुक्रवारी बाजार संपल्यानंतर जाहीर झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीची आकडेवारी फारशी समाधानकारक नाही. याचा परिणाम सोमवारी बाजारात दिसू शकेल. अर्थव्यवस्थेची वाढ पाच वर्षांतील कमी म्हणजे ५.८ टक्क्यांवर आली आहे. यामुळे रिझर्व्ह बॅँकेला मात्र व्याजदरामध्ये कपात करण्याची संधी मिळणार आहे. याबाबतची घोषणा चालू सप्ताहात होईल.

परकीय वित्तसंस्थांकडून चौथ्या महिन्यातही खरेदी
लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात भाजपचे सरकार भक्कम बहुमताने आल्यानंतर परकीय वित्तसंस्था आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदी कायम ठेवली आहे. सलग चौथ्या महिन्यात या संस्थांनी भारतामध्ये ९,०३१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
गत महिन्याच्या पहिल्या तीन सप्ताहांमध्ये सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी अखेरच्या सप्ताहामध्ये मात्र खरेदीचा जोर लावला. महिनाभरात या संस्थांनी ७,९१९.७३ कोटी रुपयांची गुंतवणूक समभागांमध्ये केली तर १,१११.४२ कोटी रुपये हे कर्जरोख्यांमध्ये गुंतविले आहेत. एप्रिल महिन्यात १६,०९३ कोटी तर मार्च महिन्यामध्ये ४५,९८१ कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे.
अधिकारारूढ झालेले भाजप शासन हे अधिक उद्योग स्रेही धोरणे राबविण्याची शक्यता असल्याने परकीय खरेदीला वेग आला आहे.


Web Title: The fast environment prevails; Moving to the new uppercase
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.