lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेतकऱ्यांची दिवाळी झोकात; ट्रॅक्टर्ससह, शेती अवजारांना मोठी मागणी

शेतकऱ्यांची दिवाळी झोकात; ट्रॅक्टर्ससह, शेती अवजारांना मोठी मागणी

महाराष्ट्रात ऊस हे नगदी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेली तीन वर्षे चांगला पाऊस झाला आहे. पूरक्षेत्रातील ऊस वगळता शेतकऱ्यांना ऊस पिकांचे पैसे चांगले आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 06:09 AM2021-10-24T06:09:47+5:302021-10-24T06:10:16+5:30

महाराष्ट्रात ऊस हे नगदी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेली तीन वर्षे चांगला पाऊस झाला आहे. पूरक्षेत्रातील ऊस वगळता शेतकऱ्यांना ऊस पिकांचे पैसे चांगले आले आहेत.

Farmers' Diwali in full swing; Great demand for farm implements, including tractors | शेतकऱ्यांची दिवाळी झोकात; ट्रॅक्टर्ससह, शेती अवजारांना मोठी मागणी

शेतकऱ्यांची दिवाळी झोकात; ट्रॅक्टर्ससह, शेती अवजारांना मोठी मागणी

- सतीश पाटील

कोल्हापूर : राज्यात दिवाळीला ५ हजार ट्रॅक्टर्स, ८ हजार ट्रेलर्स आणि १२ हजारांहून अधिक शेती अवजारांचे बुकिंग शेतकऱ्यांनी केले आहे. दसऱ्याला ट्रॅक्टर्स, ट्रेलर्स, शेती अवजारांची विक्रमी विक्री झाली होती. आता दिवाळीलाही पुन्हा शेतकऱ्यांनी बुकिंग केले आहे.
 गेली दोन वर्षे कोरोना महामारी, महापूर असतानाही यंदा दसऱ्यानंतर दिवाळीला मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.

महाराष्ट्रात ऊस हे नगदी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेली तीन वर्षे चांगला पाऊस झाला आहे. पूरक्षेत्रातील ऊस वगळता शेतकऱ्यांना ऊस पिकांचे पैसे चांगले आले आहेत. साखर कारखान्यांकडून प्रतिटन २,५०० हून अधिक रुपये दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर, ट्रेलर, शेती अवजारे खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. ट्रॅक्टर खरेदीमुळे ट्रेलर खरेदीकडे शेतकरी आपोआप वळतो. सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू झाला असून, काही कारखाने दिवाळीला सुरू करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी चारचाकी आणि दोनचाकी ट्रेलर खरेदी केली आहे. 

शेती अवजारे खरेदी दसऱ्याला सुरू झाली आहे. पल्टी फाळ नांगर आणि रोटाव्हेटरला शेतकऱ्यांकडून मागणी आहे. सिंगल पल्टी, डबल पल्टी, हायड्रोलिक पल्टी, सरी रेझर, बांडगे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.

- जाॅन डिअर, न्यू हाॅलंड, व्हीएसटी, महिंद्रा, एस्काॅर्ट, सोनालिका, कुबोटा, मॅसी फर्ग्युसन, फार्म ट्रॅक, पाॅवर ट्रॅक, स्वराज, बलवान या कंपन्यांचे ट्रॅक्टर व पावर टिलर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. राज्यात ट्रेलर आणि शेती अवजारे तयार करणाऱ्या सुमारे २ हजारांहून अधिक कंपन्या आहेत. 

दसऱ्यानंतर दिवाळीलाही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर्स खरेदीला पसंती दिली आहे. राज्यात ट्रॅक्टर्स शोरूममध्ये सुमारे ५ हजारांहून अधिक ट्रॅक्टर्सचे बुकिंग झाले आहे.
- संजय चव्हाण, भारत ट्रॅक्टर्स, कोल्हापूर.

गेली दोन-तीन वर्षे चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी शेती अवजारे खरेदी करण्यासाठी पसंती दिली आहे. राज्यात सुमारे १२ हजारांहून अधिक शेती अवजारांची दिवाळीला विक्री होईल.
- भरत पाटील, अध्यक्ष, आयमा 

शेती अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. दिवाळीला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही शेती अवजारांना मोठी मागणी आहे.
- रणजित जाधव, उद्योजक, 
पाॅप्युलर ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट, कोल्हापूर

Web Title: Farmers' Diwali in full swing; Great demand for farm implements, including tractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.