Embarrassment on the Modi government, unemployment rate at the highest level of 33 months | मोदी सरकारवर नामुष्की, बेरोजगारीचा दर 33 महिन्यांमधील सर्वोच्च स्तरावर 
मोदी सरकारवर नामुष्की, बेरोजगारीचा दर 33 महिन्यांमधील सर्वोच्च स्तरावर 

नवी दिल्ली - आर्थिक आघाडीवर निर्माण झालेल्या समस्यांमुळे मोदी सरकारसमोरील आव्हान दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यातच वाढती बेरोजगारी ही सरकारसाठी डोकेदुखी ठरत असून, जून महिन्यामध्ये बेरोजगारीचा दर हा गेल्या 33 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याने सरकारच्या अडचणीत भर पडली आहे. 

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयईई) या संस्थेने बेरोजगारीसंदर्भात प्रसिद्ध केलेली नवी आकडेवारी सरकारची डोकेदुखी वाढवणारी आहे. या आकडेवारीनुसार यावर्षी जून महिन्यांत बेरोजगारीचा दर हा गेल्या 33 महिन्यांमधील सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. केंद्रात पुन्हा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या नव्या कार्यकाळातील जून हा पहिलाच महिना होता. या महिन्यातच बेरोजगारीचा मुद्दा तीव्रतेने समोर आल्याने सरकारसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. 

सीएमआयईईच्या अहवालानुसार जूनमध्ये बेरोजगारीचा दर वाढून 7.91 टक्क्यांवर पोहोचला आहे. याआधी सप्टेंबर 2016 मध्ये बेरोजगारीचा दर सर्वोच्च पातळीवर होता. तर एक वर्षापूर्वी जून 2018 रोजी बेरोजगारीचा दर 5.8 टक्के इतका राहिला होता. तर यावर्षीच्या मे महिन्यात हा आकडा 7.2 टक्क्यांवर पोहोचला होता. तर रोजगाराच्या दराचा विचार केल्यास जून 2019 मध्ये हा दर 39.42 टक्के एवढा होता. 

 रोजगाराच्या दराचे आकडे जानेवारी 2016 नंतर सर्वात खालच्या स्तरावर आले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बेरोजगारीचा दर 9 टक्के होता. मात्र नंतर त्यामध्ये घसरण सुरू झाली. महिन्याअखेरीस हा दर 7 टक्क्यांपर्यंत खाली आला. असे  सीएमआयईईने आपल्या अहवालात म्हटले आहे.  2019-20 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये रोजगाराचा दर 39.6 टक्के होता. 2016 नंतर एका तिमाहीमधील रोजगाराचा हा सर्वात कमी दर आहे. मार्च 2019 च्या तिमाहीमध्ये रोजरागाच्या दराच्य आकड्यात 39.7 टक्क्यांवरून 39.9 टक्क्यांपर्यत वाढ झाली आहे. 
 


Web Title: Embarrassment on the Modi government, unemployment rate at the highest level of 33 months
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.