Lokmat Money > बिझनेस न्यूज > Corona Virus: चार सत्रांत गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी बुडाले; सलग दुसऱ्या दिवशी बाजारात पडझड

Corona Virus: चार सत्रांत गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी बुडाले; सलग दुसऱ्या दिवशी बाजारात पडझड

अमेरिकेच्या बाजारात घसरणीनंतर तेजी, आशियातील बाजार घसरणीसह बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 01:46 AM2020-03-14T01:46:44+5:302020-03-14T01:47:09+5:30

अमेरिकेच्या बाजारात घसरणीनंतर तेजी, आशियातील बाजार घसरणीसह बंद

Corona Virus: Investors sink 4 lakh crore in four sessions; The market fell for the second consecutive day | Corona Virus: चार सत्रांत गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी बुडाले; सलग दुसऱ्या दिवशी बाजारात पडझड

Corona Virus: चार सत्रांत गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी बुडाले; सलग दुसऱ्या दिवशी बाजारात पडझड

मुंबई : या आठवड्यात सेन्सेक्स ३,४७३.१४ अंकांनी अथवा ९.२४ टक्क्यांनी घसरला. निफ्टी १,०३४.२५ अंकांनी अथवा ९.४१ टक्क्यांनी घसरला. या घसरगुंडीमुळे मागील चार सत्रांत गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी रुपये बुडाले होते. कोटक सेक्युरिटीज्चे पीसीजी रिसर्च उपाध्यक्ष संजीव झरबडे यांनी सांगितले की, मागील पाच सत्रांत विदेशी संस्थांनी २.३ अब्ज डॉलरचे समभाग विकले. हा आठवडा भारतीय बाजारातच नव्हे, तर जागतिक बाजारातही सर्वाधिक वाईट आठवड्यांपैकी एक आठवडा ठरला. मागील चार सत्रांत अमेरिकी शेअर बाजारांत १८ टक्के घसरण झाली. गोईजीत फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रमुख गुंतवणूक धोरणकार व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले की, याआधी २२ जानेवारी २००८ रोजी बाजारात सर्किट लावण्यात आले होते.

अमेरिकेतही आधी घसरण, मग तेजी
अमेरिकेच्या शेअर बाजारांतही घसरणीनंतर तेजी पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात अमेरिकी शेअर बाजारांत १९८७ नंतरची सर्वाधिक घसरण झाली. नंतर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अ‍ॅव्हरेज व नासडॅक कंमोजिट हे निर्देशांक ५ टक्क्यांपर्यंत वाढले. युरोपीय बाजारांत सकाळच्या सत्रात सुमारे ४ टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. आशियाई बाजार मात्र घसरणीसहच बंद झाले. चीनमधील शांघायचा बाजार १.२३, हाँगकाँगचा बाजार १.१४, सेऊलचा बाजार ३.४३, व टोकिओ बाजार ६.0८ टक्क्यांनी घसरला आहे.

महाघसरगुंडीमागील १० कारणे
 

तेलाच्या किमतीत घसरण
आठवड्याच्या सुरुवातीला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ३० टक्के घसरण झाली. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसी यासारख्या बलाढ्य भारतीय तेल उत्पादक कंपन्यांच्या समभागांत विक्रमी घसरण झाली.

बँकिंग क्षेत्राबाबत संशय
येस बँक संकटामुळे वित्तीय व्यवस्थेच्या स्थैर्याबाबत संशय आहे. या व्यवस्थेबाबत लोकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली.

विदेशी संस्थांकडून विक्रीचा मारा
२४ फेब्रुवारीपासून विदेशी संस्थांकडून शेअर बाजारांत विक्रीचा मारा सुरू आहे. मार्चमध्ये विदेशी संस्थांनी तब्बल २०,८०० कोटींपेक्षा जास्त समभागांची विक्री केली.

जगभरात जोरदार विक्री : या संपूर्ण सप्ताहात जागतिक बाजारांतही जोरदार विक्रीचा मारा सुरू आहे. जगभरातील शेअर बाजार घसरले आहेत. आशियाई बाजारांतही मोठी घसरण झाली आहे.

वृद्धीदराला फटका : कोरोनाचे संकट आणखी गडद झाल्यामुळे जागतिक वृद्धीदराला फटका बसला. अमेरिका, युरोपलाही कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. परिणामी जगभरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन डबघाईला : जगभरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादन प्रकल्प चीनमधून येणाºया कच्च्या मालावर चालतात. कोरोनाचा फटका चीनमधील कच्चा माल निर्यातीच्या प्रमुख केंद्राला बसला आहे. तेथील ‘लॉकडाऊन’मुळे पुरवठा थांबला आहे.

पर्यटन उद्योगांना फटका
कोरोनामुळे जगभरात प्रवासावर बंधने आणली गेली आहेत. त्यामुळे पर्यटन व त्याच्याशी संबंधित सर्व व्यवसाय बंद पडले आहेत.

कोरोना नियंत्रणात अपयश
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रगत समजल्या जाणाºया अमेरिका व युरोपातील सरकारेही अपयशी ठरली. त्यामुळे गुंतवणूकदार बाजारापासून दूर झाले आहेत. त्यामुळे बाजार आपटले.

अमेरिकाबंदीमुळे घबराट
अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने वित्तीय बाजारास पाठबळ देण्याचा प्रयत्न केला तरी पडझड थांबली नाही. युरोपीय प्रवाशांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा केल्याने घबराट वाढून बाजार आणखी घसरले.

स्थैर्याची शाश्वती नाही
न्यू यॉर्कच्या मिडले ग्लोबल अ‍ॅडव्हाजर्सचे अर्थतज्ज्ञ बेन एमॉन्स म्हणाले की, भविष्यात बाजारात स्थैर्य निर्माण होईल असा आधार सध्या दिसत नाही. त्यामुळे बाजारांनी जबर आपटी खाल्ली आहे.

Web Title: Corona Virus: Investors sink 4 lakh crore in four sessions; The market fell for the second consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.