Cheap living in Mumbai! | मुंबईत राहणे झाले स्वस्त! महागड्या शहरांच्या यादीत झाली १२ स्थानांनी घसरण
मुंबईत राहणे झाले स्वस्त! महागड्या शहरांच्या यादीत झाली १२ स्थानांनी घसरण

 बंगळुरू : भारतातील सर्वांत महागडे शहर म्हणून परिचित असलेली मुंबई आता अधिक किफायतशीर होत असल्याचे दिसून येत आहे. जागतिक जीवनमान खर्च निर्देशांकात मुंबईची १२ स्थानांनी घसरण झाली आहे. या निर्देशांकात मुंबापुरी ६७ वरून ५५ व्या स्थानावर आली आहे.

‘मेर्सेर’ने जारी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, मुंबईतील वस्तूंच्या महागाईचा दर कमी होऊन १.८ टक्के झाला आहे. खाद्य वस्तू तुलनेने स्वस्त झाल्याचे दिसून आले. असे असले तरी मुंबई अजूनही आशियातील पहिल्या आठ तसेच जगातील पहिल्या २० महागड्या शहरांत आहे. मुंबईतील घरांच्या किमतीही जगातील सर्वाधिक महागड्या शहरांच्या यादीत आहेत.

भारतीय शहरांच्या बाबतीत मुंबईनंतर नवी दिल्ली दुसऱ्या आणि चेन्नई तिसºया स्थानी आहे. मात्र मुंबईच्या तुलनेत या शहरांचे यादीतील स्थान खूप खालचे आहे. नवी दिल्ली ११८ व्या, तर चेन्नई १५४ व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे नवी दिल्ली आणि चेन्नई ही शहरेही अधिक किफायतशीर झाली आहेत. त्यांची अनुक्रमे १० आणि १५ स्थानांनी घसरण झाली आहे. या यादीत बंगळुरू १७९ व्या तर कोलकाता १८९ व्या स्थानी आहे.

२०९ शहरांचा केला अभ्यास

या सर्वेक्षणात जगातील २०९ शहरांचा तसेच २०० वस्तू व सेवांचा अभ्यास करण्यात आला. त्यात घरे, वाहतूक, अन्न, कपडे, घरगुती वापराच्या वस्तू आणि मनोरंजनाची साधने यांचा समावेश आहे.
सिनेमा तिकिटांच्या बाबतीत लंडन २५ डॉलरसह सर्वांत महागडे शहर असून, ५ डॉलरसह मेक्सिको आणि मुंबई सर्वांत स्वस्त आहे. कॉफीची किंमत हाँगकाँगमध्ये सर्वाधिक ८ डॉलर आहे. केपटाऊनला ती केवळ २ डॉलरला मिळते.


Web Title: Cheap living in Mumbai!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.