Budget 2019: Share after the interim budget | Budget 2019: अंतरिम अर्थसंकल्पानंतर शेअर उसळले
Budget 2019: अंतरिम अर्थसंकल्पानंतर शेअर उसळले

मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २१२.७४ अंश म्हणजे ०.५९ टक्के वाढून ३६४६९.४३ अंशांवर बंद झाला. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ६२.७० अंश म्हणजेच ०.५८ टक्क्यांनी वाढून १०८९३.६५ अंशांवर बंद झाला. निफ्टीमधील ५० शेअर्सपैकी ३४ कंपन्यांचे समभाग वाढले, तर १६ कंपन्यांच्या भावामध्ये घट झाली आहे.

मुंबई : केंद्र सरकारने मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लोकानुनयी घोषणा असल्याने मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी चांगलीच उसळी घेतली. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आयकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविल्याची घोषणा करताच बाजार सुमारे ३०० अंशांनी वर गेला. मात्र, त्यानंतर तो पुन्हा खाली आला. दिवसभर सातत्याने हेलकावणारा बाजार अखेरीस वाढीव पातळीवर बंद झाला. वाहने, ग्राहकोपयोगी वस्तू आणि रिअ‍ॅलिटी कंपन्यांच्या समभागांमध्ये चांगली वाढ झालेली दिसून आली.

अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अनेक सवलती जाहीर झाल्यामुळे बाजाराने चांगलीच उसळी घेतली होती. मात्र, त्यानंतर विक्रीचा जोर वाढल्यानंतर काही काळ निर्देशांक लाल रंगामध्ये गेला होता. यानंतर पुन्हा तो वाढला. वाहन उत्पादक कंपन्या, तसेच ग्राहकोपयोगी वस्तू निर्माते यांच्या समभागांना चांगली मागणी होती. शेतकऱ्यांना मिळालेल्या विविध सवलतींमुळे शेतकºयांच्या हाती पैसा येईल आणि त्यामुळे काही उद्योगांना लाभ होईल, या आशेवर बाजार वाढलेला दिसून आला. गृहबांधणी क्षेत्रालाही काही सवलती मिळाल्या असून, त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग उजळलेले दिसले. मात्र, ही वाढ कायम टिकली नाही. सरकारच्या विविध घोषणांमुळे अर्थसंकल्पिय तूट वाढण्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली. मात्र, बाजाराने एकूणच या अर्थसंकल्पाचे स्वागत केलेले दिसून आले. काही प्रमाणात नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे बाजारात नरमाई आली होती. मात्र, ती थोडाच काळ राहिली.मागील वर्षी अर्थसंकल्प मांडला गेल्यानंतर बाजारामध्ये सुरुवातीला उत्साह होता. मात्र, त्यानंतर बाजार खाली येऊन बंद झाला होता.


Web Title: Budget 2019: Share after the interim budget
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.