केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank of Maharashtra) ओएफएसद्वारे (Offer For Sale - OFS) ६ टक्क्यांपर्यंत हिस्सा विकणार आहे. ही विक्री मंगळवारपासून सुरू होईल. सध्याच्या बाजारभावानं सरकार या बँकेतील ६ टक्क्यांपर्यंत हिस्सा विकून अंदाजे २,६०० कोटी रुपये उभे करू शकेल.
गुंतवणूक आणि लोक मालमत्ता व्यवस्थापन विभागचे (DIPAM) सचिव अरुणीश चावला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नॉन रिटेल गुंतवणूकदारांसाठी (Non-Retail Investors) विक्रीचीही सुरुवात मंगळवारी होईल. तर, किरकोळ गुंतवणूकदार बुधवारपासून बोली लावू शकतील. सरकार ५ टक्के इक्विटीची निर्गुंतवणूक करत करत आहे. तसंच, अतिरिक्त बोली आल्यास आणखी एक टक्का बोली ठेवण्याचा पर्याय ठेवला आहे.
रेड झोनमध्ये शेअर बाजार; ८७ अंकांनी घसरुन २६,०८८ वर उघडला निफ्टी
सरकारचा हिस्सा ७९.६०%
पुणेस्थित या बँकेत सध्या सरकारची ७९.६० टक्के भागीदारी आहे. हिस्सा कमी केल्यामुळे, बँकेला २५ टक्क्यांची किमान सार्वजनिक शेअरधारिता निकष पूर्ण करण्यात मदत मिळेल, कारण यामुळे सरकारी भागीदारी ७५ टक्क्यांपेक्षा कमी होईल. भारतीय बाजार नियामक सेबीच्या (SEBI) नियमांनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसह सर्व लिस्टेड युनिट्समध्ये किमान २५ टक्के सार्वजनिक शेअरधारिता अनिवार्य आहे. भांडवली बाजार नियामक सेबीनं सीपीएसई (CPSE) आणि सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना ऑगस्ट २०२६ पर्यंत सूट दिली आहे.
याव्यतिरिक्त, सरकारची इंडियन ओव्हरसीज बँक (९४.६%), पंजाब अँड सिंध बँक (९३.९%), युको बँक (९१%) आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया (८९.३%) या अन्य चार बँकांमध्येही सरकारचा हिस्सा अधिक आहे.
५ वर्षांत ३०६ टक्क्यांची वाढ
बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स गेल्या ५ वर्षांत ३०६ टक्क्यांनी वाढले आहेत. या सरकारी बँकेचे शेअर्स ४ डिसेंबर २०२० रोजी १४.१९ रुपयांवर होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स सोमवार, १ डिसेंबर २०२५ रोजी ५७.६६ रुपयांवर बंद झाले आहेत. गेल्या ४ वर्षांत बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्समध्ये १९६ टक्के वाढ दिसून आली.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
