'Auto sector should not bowl for discounts' | 'ऑटो क्षेत्राने सवलतींसाठी कटोरा घेऊ नये'
'ऑटो क्षेत्राने सवलतींसाठी कटोरा घेऊ नये'

पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्राची एक वेगळी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे या क्षेत्राने सवलती मागण्यासाठी हाती कटोरा घेण्याची गरज नाही. मागणीमध्ये केवळ दहा टक्के घट झाली आहे. अनेक उत्पादकांकडे मागणीच्या तुलनेत जास्त उत्पादन असल्याने त्याची तीव्रता अधिक वाटते. व्यवसायात कधी ना कधी मंदी येतच असते. त्याला उद्योगांनी सामोरे गेलेच पाहिजे, अशा शब्दांत बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीवर मत व्यक्त केले.

बजाजची चेतक इलेक्ट्रिक स्वरुपात येत आहे. जानेवारी महिन्यात ही गाडी ग्राहकांच्या हाती प्रत्यक्षात पडेल. त्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘इलेक्ट्रिक यात्रे’चे स्वागत करताना बजाज बोलत होते. सादर केली जाणारे नवे इलेक्ट्रॉनिक उत्पादन आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदी यावर बजाज यांना विचारले असता त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले.

बजाज म्हणाले की, कोणत्याही व्यवसायात चढ-उतार होतच असतात. अनेक उत्पादकांकडे मागणीच्या तुलनेत साठा अधिक आहे. थेट विक्रीमध्ये फारशी घट झालेली नाही. मागणीतील दहा टक्के घट ही सामान्य मानली जाते. व्यवसाय करताना अशा या प्रसंगाला तोंड द्यायलाच हवे. त्यासाठी कंपन्यांना परदेशी बाजारपेठा धुंडाळाव्या लागतील. मात्र, देशातील काही कंपन्यांची निर्यात पाहिल्यास ती अगदी तुरळक आहे. या कंपन्यांना एक तर परदेशी बाजारपेठ धुंडाळायची नाही अथवा त्यांच्या उत्पादनात परदेशी बाजारपेठ काबीज करण्याची क्षमता नाही, ही दोनच कारणे असू शकतील.

Web Title: 'Auto sector should not bowl for discounts'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.