Anil Ambani will now sell 21,700 crore properties | अनिल अंबानी आता विकणार २१,७०० कोटींच्या मालमत्ता
अनिल अंबानी आता विकणार २१,७०० कोटींच्या मालमत्ता

नवी दिल्ली : आपल्या कंपन्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मालमत्ता विकून २१,७०० कोटी रुपये (३.२ अब्ज डॉलर) उभे करण्याचा निर्णय अनिल अंबानी यांनी घेतला आहे. रस्त्यांपासून रेडिओ स्टेशनपर्यंतच्या मालमत्ता विकण्याची त्यांची योजना आहे.
अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोणत्या मालमत्ता विकायच्या हेही निश्चित करण्यात आले आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.चे नऊ रस्ते प्रकल्प विकून ९ हजार कोटी रुपये उभारण्यात येतील. रिलायन्स कॅपिटलचे
रेडिओ युनिट विकून १,२०० कोटी  रुपये उभारले जातील.
वित्तीय व्यवसायातील हिस्सेदारी विकून ११,५०० कोटी रुपये मिळतील. अनिल अंबानी हे आपल्या कंपन्यांच्या कर्जाविरुद्ध लढत
आहेत. ११ जून रोजी त्यांनी म्हटले होते की, मागील १४ महिन्यांत आपल्या रिलायन्स समूहाने ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. हे सगळे कर्ज मालमत्ता विकून फेडण्यात आले आहे.

 
समूहावर ९३,९00 कोटी रुपयांचे कर्ज रिलायन्स समूह अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली आहे. या समूहातील चार मोठ्या कंपन्यांवरील कर्जाचा आकडा ९३,९०० कोटी आहे. यात रिलायन्स कम्युनिकेशन्सचा समावेश नाही. ही कंपनी आधीच दिवाळखोरीत गेली आहे. आणखी मालमत्ता विकल्यास अनिल अंबानी यांच्या कंपन्यांची वित्तीय स्थिती सुधारू शकेल.


Web Title: Anil Ambani will now sell 21,700 crore properties
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.