2 lakh crores scam in 11 years | ११ वर्षांत बँकांमध्ये झाले २ लाख कोटींचे घोटाळे
११ वर्षांत बँकांमध्ये झाले २ लाख कोटींचे घोटाळे

नवी दिल्ली : गेल्या ११ वर्षांमध्ये सरकारी व खासगी बँकांमध्ये ५० हजारांपेक्षा अधिक आर्थिक घोटाळे झाले असून, त्यांचा सर्वाधिक फटका आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) आणि एचडीएफसी बँक यांना बसला आहे.

रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, २००८-९ ते २०१८-१९ या १0 वर्षांच्या काळात ५३ हजार ३३४ घोटाळे झाले. यात बँकांची अडकलेली रक्कम तब्बल २.०५ लाख कोटी रुपये आहे. सर्वाधिक ६,८११ घोटाळे आयसीआयसीआाय बँकेत झाले आहेत. त्यातून बँकेला ५,०३३ कोटी ८१ लाख रुपयांना फटका बसला. एसबीआयमधील ६,७९३ घोटाळ्यांत २३ हजार ७३४ कोटी ७४ लाख रुपये बुडाले. एचडीएफसी बँकेत २,४९७ घोटाळे झाले. त्यातून बँकेला १,२०० कोटी ७९ लाख रुपयांचा फटका बसला.

रिझर्व्ह बँकेने म्हटले की, बडोदा बँकेत १२ हजार ९६२ कोटी ९६ लाख रुपयांचे २,१६० घोटाळे झाले. पंजाब नॅशनल बँकेत २,०४७ घोटाळे (२८,७००.७४ कोटी), तर अ‍ॅक्सिस बँकेत १,९४४ घोटाळे (५,३०१.६९ कोटी) झाले. बँक आॅफ इंडियातील १,८७२ घोटाळ्यांत १२,३५८.२ कोटी रुपये अडकले आहेत. सिंडिकेट बँकेत १,७८३ घोटाळे (५,८३०.८५ कोटी) आणि सेंट्रल बँक आॅफ इंडियात १,६१३ घोटाळे (९,०४१.९८ कोटी) झाले आहेत. आयडीबीआय बँकेतील १,२६४ घोटाळ्यांत ५,९७८.९६ कोटी, तर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेतील १,२६३ घोटाळ्यांत १,२२१.४१ कोटी रुपये अडकले आहेत.

विदेशी बँकांचेही झाले नुकसान
कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरियंटल बँक आॅफ कॉमर्स, युनायटेड बँक, स्टेट बँक आॅफ म्हैसूर, स्टेट बँक आॅफ पटियाला, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, तामिळनाड मर्कंटाइल बँक आणि लक्ष्मी विलास बँक यांनाही घोटाळ्यांमुळे हजारो कोटींचा फटका बसला आहे. काही विदेशी बँकांही घोटाळ्यात अडकल्या आहेत. अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्पोरेशन, सिटी बँक, हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन आणि रॉयल बँक आॅफ स्कॉटलँड यांचा त्यात समावेश आहे.


Web Title: 2 lakh crores scam in 11 years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.