बुलडाणा शहर ‘व्हिजन डॉक्युमेंट’ चा मार्ग मोकळा
By Admin | Updated: January 23, 2015 01:48 IST2015-01-23T01:48:09+5:302015-01-23T01:48:09+5:30
पालिकेने केले व्हीजन डॉक्युमेंटचे सादरीकरण; जिल्हाधिकारी यांनी दिली तत्वत: मान्यता.

बुलडाणा शहर ‘व्हिजन डॉक्युमेंट’ चा मार्ग मोकळा
बुलडाणा : जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या बुलडाणा शहराच्या विकासासाठी नगरपालिकेने तयार केलेल्या व्हीजन डॉक्युमेंटह्ण ला जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या अध्यक्षतेखाली आज २२ जानेवारी रोजी तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या धर्तीवर बुलडाणा शहराला आगामी ५0 वर्षात भेडसावणार्या समस्या लक्षात घेऊन हे व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. गुजरातमधील वडोदरा येथील एएनजे पॉवर टेक्नॉलॉजी या कन्सलटंट कंपनीने हे व्हीजन डॉक्युमेंट तयार केले आहे. यामध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, नाल्या, बगीचे, रस्ते, आठवडी बाजार, शहरातील तलाव, तसेच नगरपालिका इमारत अशा विविध मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. या व्हीजन डॉक्युमेंटनुसार विविध योजनांचे जीपीआरएस पद्धतीनेही सादरीकरण जिल्हाधिकार्यांसमोर झाले, यावेळी नगराध्यक्ष टी.डी.अंभोरे पाटील, मुख्याधिकारी संजीव ओहळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता सरकटे, बांधकाम विभागाचे अभियंता बाळासाहेब ठेंग आदी उपस्थित होते.
या व्हीजन डॉक्युमेंटसंदर्भात मुख्याधिकारी संजीव ओहळ यांनी विविध मुद्यांवर माहिती दिली. शहरासाठी प्रस्तावित असलेल्या योजनांचा समावेश केंद्र, राज्य तसेच जिल्हा विकास समितीमधील आराखड्यात करावा लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून पालिका प्रशासनाला सूचना केल्या आहेत. यासंदर्भात मुख्याधिकारी ओहळ यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शहराचा कायापालट करणारे हे नियोजन असून, याबाबत लवकरच कार्यमान्यताही अपेक्षित आहे. यासोबतच शहरातील पथदिवे, स्वच्छता अभियान विशेषत: पार्कींगचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.
यासंदर्भात जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालिकेने सादर केलेले व्हीजन डॉक्युमेंट उत्तम असल्याची पुस्ती जोडली. त्या योजनांबाबत आज सादरीकरण झाल्यानंतर तत्वत: मान्यता दिली असून तसेच काही सूचना केल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांनी नगरपालिकेने शहराच्या पुढील ५0 वर्षाचा विस्तार लक्षात घेता शहर विकास आराखडा तयार केला असल्याचे सांगून सर्व सदस्य तसेच शहरातील नागरिकांच्या सहकार्याने हा आराखडा पूर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न पालिकेच्यावतीने केला जाणार असल्याचे सांगीतले.