चिखली तालुक्यात पावसाळ्यातही  टँकरचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 11:26 AM2021-06-22T11:26:26+5:302021-06-22T11:26:35+5:30

Water Scarcity in Chikhli : सैलानी नगरची स्थिती अत्यंत गंभीर असून, पावसाळ्यातदेखील येथे टँकरने पाणीपुरवठा होतो. 

Tanker water in Chikhali taluka even during monsoon | चिखली तालुक्यात पावसाळ्यातही  टँकरचे पाणी

चिखली तालुक्यात पावसाळ्यातही  टँकरचे पाणी

Next

- सुधीर चेके पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : यंदा जून महिना संपण्यास आला असला तरीही तालुक्यातील काही मंडळे वगळता अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अनेक गावांमध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. यामध्ये आता शहराचाच एक भाग बनलेल्या सैलानी नगरची स्थिती अत्यंत गंभीर असून, पावसाळ्यातदेखील येथे टँकरने पाणीपुरवठा होतो. 
चिखली तालुक्यातील यावर्षी मे अखेरपर्यंत २८ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. जून महिना सुरू झाल्यानंतर पाणीटंचाई दूर होईल, अशी अपेक्षा टंचाईची झळ सोसणाऱ्या गावांना होती. मात्र, आता पावसाळा लागलेला असतानाही तालुक्यातील उंद्री, वैरागड, हरणी, टाकरखेड मु., अमडापूर, मुंगी, धानोरी, किन्ही सवडद, घानमोड व अमडापूर ही गावे वगळता तालुक्याला अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. याचा परिणाम   जीवमानावर होत असल्याने किमान पाणीटंचाईतून सुटका होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. पावसाअभावी टंचाईग्रस्त गावांची भिस्त असलेल्या पाणीपुरवठ्या जलस्तोत्रांमध्ये अद्यापही मुबलक प्रमाणात जलसाठा झालेला नाही. परिणामी २८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ उन्हाळ्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना अद्यापही कायम आहेत. या अनुषंगाने २६ गावांसाठी विहिरींचे, दोन गावांसाठी बोअरचे अधिग्रहण अद्यापही कायम आहे. यापैकी १४ गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. असोला, सैलानी नगर आणि कोलारा या तीन गावांत चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या अनुषंगाने खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 


पाण्यासाठी टँकरवर नागरिकांची झुंबड 
गट ग्रामपंचायतीत समावेश असला तरी शहराशी एकजीव झालेल्या सैलानी नगर आज पाण्यासाठी मोताद झाले आहे. पालिका हद्दीवाढीच्या चक्रात फसलेल्या या भागातील नागरिकांना चक्क बादलीभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा टँकर पोहोचताच या भागात पाणी भरण्यासाठी मोठी झुंबड उडते. 

Web Title: Tanker water in Chikhali taluka even during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.