बियाणे टंचाईवर उन्हाळी सोयाबीनची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:01 PM2021-03-03T12:01:11+5:302021-03-03T12:01:59+5:30

Agriculture News जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रयोग राबविण्यात येत आहे

Summer soybean quantity on seed shortage | बियाणे टंचाईवर उन्हाळी सोयाबीनची मात्रा

बियाणे टंचाईवर उन्हाळी सोयाबीनची मात्रा

googlenewsNext

- ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बीजोत्पादनात बुलडाणा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे; परंतु खरीप हंगामात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ९४ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानामुळे यंदा बियाणे तुटवड्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. बियाणेटंचाईवर ही पेरणी महत्त्वाची मात्रा ठरेल, असा अंदाज आहे.
राज्यात वाशिम, हिंगोली, परभणी आणि बुलडाणा, या चार जिल्ह्यांत प्रामुख्याने बीजोत्पादन सर्वाधिक होते. बीजोत्पादनातून जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना वर्षाकाठी तब्बल ५२ कोटी रुपयांचा मोबदला मिळत आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात १ लाख ७४ हजार क्विंटल बीजोत्पादनाचे उद्दिष्ट होते; परंतु अतिपावसामुळे या बीजोत्पादनावरही परिणाम झाला. जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ९४ हजार १३३.३७ हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात गेले. गतवर्षी निकृष्ट बियाण्यांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता. येत्या खरीप हंगामातील बियाणेटंचाईची शक्यता पाहता, कृषी विभागाकडून उन्हाळी पेरणीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा उन्हाळी सोयाबीन बियाणेटंचाईवर महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. उन्हाळ्यात झडती लागत नाही. त्यामुळे शक्यतो पेरणी केली जात नाही; परंतु यंदा बियाणेटंचाई पाहता, अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनला पसंती दिली आहे. 


दरम्यान यंदा प्रथमच उन्हाळी साेयाबीन घेण्याचा प्रयाेग जिल्ह्यात करण्यात येत आहे. त्याचा कितपत लाभ हाेताे हे नंतर कळेल.
गतवर्षी झालेल्या अतिपावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा खरिपात बियाणे तुटवड्याची शक्यता पाहता, शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची घेतलेली आहे. सध्या हे सोयाबीन चांगल्या स्थितीत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा बियाण्याचा प्रश्न मिटणार आहे. यामुळे नवीन वाण शेतकऱ्यांना मिळेल.
-सी.पी. जायभाये, 
कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा

Web Title: Summer soybean quantity on seed shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.