मेहकर तालुक्यात ८५ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:24 AM2021-06-18T04:24:48+5:302021-06-18T04:24:48+5:30

मेहकर : खरीप हंगामामध्ये मेहकर तालुक्यात ८५ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन असून, यामध्ये तब्बल ६९ हजार हेक्टरवर सोयाबीन ...

Sowing planning on 85,000 hectares in Mehkar taluka | मेहकर तालुक्यात ८५ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन

मेहकर तालुक्यात ८५ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन

Next

मेहकर : खरीप हंगामामध्ये मेहकर तालुक्यात ८५ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन असून, यामध्ये तब्बल ६९ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केेले आहे. त्यातच तालुक्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १९ टक्के पाऊस पडल्याने ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे.

दरम्यान, पेरणीयोग्य पाऊस होत नाही, तोवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केली आहे. मेहकर तालुक्यातील दहा महसूल मंडलांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात शेतीच्या मशागतीची कामे उरली आहेत. अपेक्षित पाऊस नसताना पेरणी केल्यास सोयाबीन किंवा इतर पिकांचे बियाणे योग्य पद्धतीने उगत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. परिणामी शेतकऱ्यांनी पेरणीबाबत योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.

चालू खरीप हंगामामध्ये तालुक्यातील ६९ हजार हेक्टरवर सोयाबीन, ११ हजार ५०० हेक्टरवर तूर, १२०० हेक्टरवर मूग, १८०० हेक्टरवर उडीद, ८० हेक्टरवर मका, १२०० हेक्टरवर कापूस आणि १५० हेक्टरवर अन्य पिके घेतली जातील, असे कृषी विभागाने नियोजन केले आहे. मेहकर तालुक्यात ८५ हजार ३६४ हेक्टर क्षेत्र साधारणत: वहितीखाली आहे. सध्या मेहकर तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने काही भागात पेरणीला प्रारंभ झाला आहे.

- सोयाबीन पेरणी करताना घ्या काळजी--

सोयाबीन हे तालुक्यातील मुख्य पीक असल्यामुळे पेरणी करताना काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पेरणी करत असताना अष्ट सुत्रीचा वापर करूनच पेरणी करण्यात यावी. सोयाबीन बियाणे पेरणी करण्यापूर्वी घरचे बियाणे असो किंवा बाजारातून खरेदी केलेले असो, त्याची उगवण शक्ती तपासूनच पेरणी करावी. ७० टक्के उगवणक्षमता असल्यास शिफारशीप्रमाणे पेरणी करावी. त्यापेक्षा कमी उगवणशक्ती म्हणजेच ७० ते ६० टक्के उगवणशक्ती असल्यास प्रति एक टक्का कमी उगवण शक्तीस अर्धा किलो बियाणे वाढवून घ्यावे. बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. शक्यतो दहा वर्षांच्या आतील वाणांची निवड करावी. पेरणी करताना बीबीएफ यंत्राचा वापर करून एकरी २२ किलो बियाणे वापरावे.

--पेरणीची खोली ५ सेंमीपर्यंत असावी--

पेरणीची खोली ३ ते ५ सेंमीपर्यंत असावी. ट्रॅक्टरद्वारे पेरणी केल्यास ट्रॅक्टर सेकंड लोअर गिअरमध्येच ठेवून पाच किलोमीटर प्रतितास या वेगाने चालवून ४५ ते ५० मिनिटांच्या कालावधीत एका एकराची पेरणी करावी. शक्यतो रात्री पेरणी करू नये, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

--शिफारशीप्रमाणे खताचा वापर करावा--

शेतकऱ्यांनी शिफारशीप्रमाणे खताचा वापर करावा. अनावश्यक खताचा वापर करू नये. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांच्या दरम्यान दोन ते तीन पानांवर पीक असताना तणनाशकाची फवारणी करावी. मात्र, ती करताना गढळू पाणी वापरू नये, असे तालुका कृषी अधिकारी किशोर काळे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sowing planning on 85,000 hectares in Mehkar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.