Separate dialysis unit operating in Khamgaon | खामगावात स्वतंत्र डायलेसिस युनिट कार्यरत
खामगावात स्वतंत्र डायलेसिस युनिट कार्यरत

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागातील किडणी रुग्णांची संख्या पाहता दिवंगत लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी खामगाव येथे डायलेसिस युनिट असावे असा आग्रह धरला होता. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते या युनिटचा शुभारंभ झाला. 

सुमारे १ कोटी रुपये खर्चातून डायलेसिस युनिट बांधण्यात आले आहे. ३ मार्च रोजी आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी इमारतीचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अद्यावत सुविधेसह चार महिन्यातच हे डायलिसीस युनिट रुग्ण सेवेत सुरू करण्यात आले आहे. या युनिटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य की याठिकाणी अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. खामगाव येथील रुग्णालयात आता स्वतंत्र डायलिसीस युनिट ची संख्या ६ वर पोहचली आहे. त्यामुळे किडणीग्रस्त रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे. खामगाव, संग्रामपूर, जळगाव, नांदुरा, शेगांव परिसरातील बरीच गावे खारपाण पट्यात असल्याने किडणीग्रस्त रुग्णांची संख्या मोठी आहे.

एका किडणीग्रस्त रुग्णाला एका महिन्यात १० ते १२ वेळा डायलिसीस करावे लागते. यासाठी  मोठ्या शहरात रुग्णाला एक वेळेस सुमारे २५०० ते ३००० रुपये मोजावे लागतात, म्हणजेच महिन्याकाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च होतात. खामगाव उभारलेल्या या युनिट मुळे असंख्य गोर गरीब गरजू रुग्णांना मोठा लाभ व दिलासा मिळणार आहे. खामगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. बी. वानखडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे, रुग्णकल्याण समितीचे सदस्य संजय शिनगारे, राम मिश्रा यांनी खामगाव येथे स्वतंत्र डायलेसिस युनिट असणे गरजेचे आहे अशी मागणी रेटून धरली होती. यासर्व बाबीची दखल घेवून आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. युनिटच्या उभारणीसाठी १ कोटींचा निधी आणि अद्यावत मशीनरी उपलब्ध झाल्या.

बुधवारी संध्याकाळपासून डायलेसिस युनिट कार्यान्वीत झाले. यावेळी आमदार अ‍ॅड.आकाश फुंडकर यांनी किडणीग्रस्त रुग्णांची आस्थेने विचारपूस केली.  युनिटचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांशी चर्चा केली. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक  डॉ. एस . बी. वानखडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे, रुग्णकल्याण समिती चे सदस्य संजय शिनगारे, राम मिश्रा , रक्तपेढी चे तज्ञ डॉ छाजेड, नगरसेवक सतीशआप्पा दुडे, दिलीपसेठ गुप्ता, आदींची उपस्थिती होती. खामगाव सामान्य रुग्णालयात नव्यानेच सिटीस्कॅन मशिनही उपलब्ध झाली आहे. लवकरच ही सेवा सुद्धा रुग्णांना मिळणार आहे. यासाठी स्वतंत्र युनिटचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. रुग्णालयातील कान, नाक, घसा तज्ज्ञांचे पद बºयाच वर्षापासून रिक्त होते. डॉ. जयंत सोनोने यांची नियुक्ती याठिकाणी झाली असून त्याचाही फायदा रुग्णांना होणार आहे.

Web Title: Separate dialysis unit operating in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.