Prosperity will be done by June 2022! | ‘समृद्धी’चे काम जून २०२२ पर्यंत होणार!

‘समृद्धी’चे काम जून २०२२ पर्यंत होणार!

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जून २०२२ पर्यंत समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्वास नेवून राज्याच्या आर्थिक राजधानीस जोडणारा हा रस्ता प्रत्यक्षात कार्यान्वीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न असल्याची माहिती एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.
गेल्या दोन दिवसापासून जालना, बुलडाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या कामाचा प्रत्यक्ष स्थळपाहणी करून ते आढावा घेत आहेत. यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, राज्य रस्ते विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक मधुसूदन खडसे यांच्यासह अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. नऊ सप्टेंबर रोजी त्यांनी सावरगाव माळ येथील नवनगराच्या एकंदरीत कामाची पाहणी तथा पॅकेज सात मधील प्रत्यक्ष स्थिती काय आहे ? याची सविस्तर माहिती जाणून घेतली. बुलडाणा जिल्ह्यातील पॅकजे सात अंतर्गत येत असलेले ५१ किमीचे काम धिम्या गतीने सुरू असून त्याचा वेग वाढविण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. दहा सप्टेंबर रोजी मेहकर तालुक्यातील पॅकेज सहाच्या कामाची त्यांनी पाहणी करून येथील कामाबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातून ८७.२९ किमी लांबीचा हा समृद्धी महामार्ग जात आहे. या रस्त्यासाठी १२०० हेक्टरपेक्षा अधीक जमीन संपादीत करण्यात आली असून असून मेहकर तालुक्यातील ३६ व लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील ५१ किमी लांबीचा हा रस्ता जात आहे.  या मार्गाची धावपट्टी सरळीकरण, वृक्षतोड व जमीन समतल करण्यावर भर देण्यात आलेला असून बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. त्याचाही सविस्तर आढावा त्यांनी घेतला. यामध्ये  सावरगाव माळ येथे नवनगर अर्थात समृद्धी कृषी नगर उभारण्यात येत आहे. त्याचीही सविस्तर माहिती त्यांनी घेतली. दरम्यान, नवनगरासंदर्भात सविस्तर आढावा अन्य एका बैठकीत ते घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच नवनगराच्या एकूण सीमा क्षेत्राचीही त्यांनी पाहणी केली आहे. समृ्द्धी  महामार्गासाठी १२०० हेक्टरपेक्षा अधीक जमीन संपादीत करण्यात आली असून त्यापोटी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक मोबदला शेतकºयांना देण्यात आलेला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात या रस्त्याच्या कामावर असणारे कुशल मजूर स्वगृही परत गेल्यामुळे मधल्या काळात ही कामे रखडली होती. 


नवनगरासंदर्भात स्वतंत्र बैठक
नवनगरांच्या कामांना वेग देण्यासाठी लवकरच एक स्वतंत्र बैठक घेण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. दरम्यान,  सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ येथील ५०० हेक्टरवरील जमीनीचे हवाई सर्वेक्षण पूर्ण झाले असून नवनगरामध्ये समाविष्ट असलेल्या गोळेगाव व निमखेड येथील कामाचीही स्थिती या स्वतंत्र बैठकीत जाणून घेण्यात येणार आहे. यापूर्वी ड्रोन सर्वेदरम्यान, पिलर मार्किंग, संयुक्त मोजणीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. सोबतच जालना, बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तीन गावांच्या शिवारातील या नवनगरात अल्पावधीतच राज्य वखार महामंडळाच्या गोडावूनचीही कामे सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी या पाहणी दौºया दरम्यान दिले. एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी जालना जिल्ह्यातील पॅकेज आठ पासून उलट्या दिशेने पॅकेज एक पर्यंत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी सुरू केली आहे. दोन दिवस बुलडाणा जिल्ह्यातील कामाची पाहणी केल्यानंतर दुपारी ते वाशिम जिल्ह्यातील पॅकेज क्रमांक पाच व चारची पाहणी करत असल्याचे एमएसआरडीसीच्या सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Prosperity will be done by June 2022!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.