Mehkar Tahsil News : 'Hey, are there saheb'? | ‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? गैरहजर कर्मचाऱ्याने आवाज देत मारल्या कार्यालयाच्या चकरा 
‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? गैरहजर कर्मचाऱ्याने आवाज देत मारल्या कार्यालयाच्या चकरा 

मेहकर -  ‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? असा आवाज मेहकर तहसील कार्यालय परिसरात बराच वेळ घुमला. त्यामुळे या आवाजाकडे तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांचे लक्ष वेधले होते. तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागातील कनिष्ठ लिपिक कधीच जागेवर राहत नसल्यामुळे  त्रस्त झालेल्या एका नागरिकाने बुधवारी त्या कर्मचा-याच्या टेबलवरील नावाची पाटी चक्क डोक्यावर घेऊन कर्मचा-यांच्या नावाने आवाज देत देत संपूर्ण तहसीलला चकरा मारल्या. 

मेहकर तहसीलमध्ये दररोज असंख्य नागरिक आपल्या महसूलच्या कामानिमित्त येत असतात. यामध्ये महिला, पुरुष, तरुण वर्गासह वृद्धांचा सुद्धा समावेश असतो. शेतीशी निगडीत कामे, खरेदी-विक्रीचे व्यवहार, फेरफार उतारा यासारख्या असंख्य कामासाठी नागरिक येत असतात.  अधिकारी व कर्मचारी आपल्या जागेवर उपस्थित राहत नसतील तर अनेक कामांचा खोळंबा होतो. कर्मचाºयांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, पाच मिनिट बसा आलोच, अशी उत्तरे दिली जातात. नागरिकांना मात्र यामध्ये ताटकळत बसावे लागते. मेहकर तहसील कार्यालयात सारशिव येथील मनीष दादाराव जाधव हे निवेदन देण्यासाठी आवक-जावक विभागात दोन तासापासून कनिष्ठ लिपिक  आर. व्ही. शिंदे यांच्या कक्षात बसले होते.  मात्र शिंदे यांचा कुठेच पत्ता नव्हता. इतर विभागाचे कर्मचारी सुद्धा आवक-जावक विभागात पत्रव्यवहार देण्यासाठी येत होते. ते सुद्धा तसेच रिकाम्या हाताने परत जात होते.

आजूबाजूला चौकशी केली असता शिंदे आता येतीलच असे उत्तर त्यांना देण्यात येत होते. शेवटी कंटाळून मनीष जाधव यांनी शिंदे यांच्या टेबलवर असलेली त्यांच्या नावाची पाटी चक्क डोक्यावर घेऊन इकडे ‘शिंदे साहेब आहेत का हो शिंदे साहेब’? असा आवाज देत संपूर्ण तहसीलमध्ये फेºया मारल्या. या प्रकाराने उपस्थित नागरिकांमध्ये एकच हश्शा पिकला होता. मात्र अशा कर्मचाºयांविरुद्ध अनेक जणांनी रोष व्यक्त केला. यासंदर्भात कनिष्ठ लिपिक  आर. व्ही. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.  

विभाग प्रमुखांनी द्यावे लक्ष 
कर्मचाºयांवर विभाग प्रमुखांचे नियंत्रण हवे. तहसीलमधील आवक-जावक विभागाचा कर्मचारी जर  गैरहजर राहत असेल तर त्या कर्मचाºयांविरुद्ध विभाग प्रमुखांनी ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. कर्मचारी रजेवर असेल तर आवक-जावक विभागात दुसºया कर्मचाºयाची तात्पुरती नेमणूक करणे हे विभाग प्रमुखाचे काम आहे. मात्र या दोन पैकी कुठलाही प्रकार या ठिकाणी आढळून आलेला नाही.


Web Title: Mehkar Tahsil News : 'Hey, are there saheb'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.