हनी ट्रॅपद्वारे २५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 04:28 PM2020-07-01T16:28:08+5:302020-07-01T16:30:14+5:30

एका महिलेसह तिच्या दोन साथिदारांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात पकडले आहे.

Honey Trap | हनी ट्रॅपद्वारे २५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न

हनी ट्रॅपद्वारे २५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देतीन जणांना अटक करण्यात आली.चार लाख रुपये घेतांना रंगेहात पकडले.देऊळगाव राजा पोलिसात गुन्हा दाखल.

बुलडाणा: ब्युटी पार्लर सुरू करण्याच्या बहाण्याने देऊळगाव राजातील एका व्यक्तीशी परिचयोत्तर संपर्क वाढवून त्याच्याकडून २५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाºया एका महिलेसह तिच्या दोन साथिदारांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात पकडले आहे. ३० जून रोजी ही कारवाई करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
प्रकरणी देऊळगाव राजा तालुक्यातील भीवगाव येथील राहूल सर्जेराव गाडेकर, रोहीणी नितीन पवार (२९, रा. जमुना नगर, रेल्वे स्टेशन मागे जालना) आणि सचिन दिलीप बोरडे (२४, रा. वाघळुर, जि. जालना) या तीन जणांना अटक करण्यात आली असून सध्या ते पोलिस कोठडीत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चार लाख रुपये, मोबाईल व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
देऊळगाव राजा येथील एका व्यक्तीला ब्युटी पार्लर सुरू करण्याच्या निमित्ताने एका महिलेने मध्यंतर भ्रमणध्वनी केला होता. मात्र संबंधीत व्यक्तीने आपल्याकडे कुठलाही गाळा नसून प्लॉट आहेत. पण ते विकायचे नाहीत, असे स्पष्ट केले होते. दरम्यान व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान तुम्ही मदत करा अशी भूमिका महिलेने घेतली. त्यातून दोघांचा घनिष्ठ परिचय झाला. त्यातून ते एक मेकांचे चांगले मित्रही बनले त्यातून झालेल्या त्यांच्या भेटीचे चित्रीकरण महिलेचे सहकारी राहूल गाडेकर आणि सचिन बोरडे यांनी केले. सोबतच ते दाखवून २५ लाख द्या नाहीतर खोटी बलात्काराची तक्रार तथा अ‍ॅट्रॉसिटी दाखल करून व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊळगाव राजातील संबंधित व्यक्तीस केली होती.
प्रकरणी संबंधिताने स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. त्यावरून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख, पोलिस उपनिरीक्षक नागेशकुमार चतरकर, पोलिस उप निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलिस नायक रघुनाथ जाधव, लक्ष्मण कटक, भारत जंगले, अनुराधा उबरहंडे यांनी सापळा रचून ३० जून रोजी देऊळगाव राजा येथील चिखली-जालना बायपासवर आरोपींना तक्रारकर्त्याकडून चार लाख रुपये घेतांना रंगेहात पकडले. प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हनीट्रॅपद्वारे अनेकांची फसवणूक
अशा प्रकारच्या हनी ट्रॅपद्वारे बुलडाणा आणि जालना जिल्ह्यातील अनेकांची या तिघांनी फसवणूक करून पैसे उकळले असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्यानुषंगाने फसवणूक झालेल्यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाणे किंवा स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार द्यावी. त्यांचे नाव व संपूर्ण माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Honey Trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.