Heavy rain Yelgaon dam 'overflow' | दमदार पावसाने येळगाव धरण ‘ओव्हर फ्लो’
दमदार पावसाने येळगाव धरण ‘ओव्हर फ्लो’

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आठवड्यापासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे येळगाव धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. धरणक्षेत्रातील वरच्या भागात सतत पाऊस झाल्याने पाच दिवसात पैनगंगा नदीला चार वेळेस पूर आला. धरण पुर्ण भरल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बुलडाणेकरांची भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
बुलडाणा शहरासह परिसरातील गावाला येळगाव धरणावरुन पाणीपुरवठा केला जातो. धरणाची पाणी साठवण क्षमता १२.४० दलघमी आहे. येळगाव धरणामुळे आजूबाजूचा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. धरणक्षेत्रातील वरच्या भागात पाऊस झाला की, धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ होते. २६ जूनच्या रात्री बुलडाणा तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने पैनगंगेला पूर आला. साखळी बु.मंडळात ८३ मिमी, धाड ८१ मिमी , देऊळघाट ७३ तर म्हसला बु. मंडळात ७१ मिमी पावसाची नोंद झाली. अंभोडा, उमाळी, हतेडी खुर्द, कोलवड, सागवन, दुधा, देवपूर, देऊळघाट, धाड, बोरखेड, साखळी बु., साखळी खुर्द, अंत्री तेली गाव परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले. मात्र मुसळधार पावसाने येळगाव धरण १०० टक्के भरले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र बुलडाणेकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या नाही. तर यावर्षीही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येळगाव धरण १०० टक्के भरल्याने नागरिकांची चिंता मिटली आहे. बुलडाणेकरांना दरडोई १०० लीटर याप्रमाणे दररोज ७० लाख लीटर पाणी लागते. परिसरातील गावांनाही येळगाव धरणातूनच पाणीपुरवठा होतो. येळगाव धरणातून प्रतिदिन ९० लाख लीटर पाण्याची उचल होते. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी येळगाव धरणातील गाळ काढण्याची मोहिम हाती घेतली होती. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता वाढली. काढलेला गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकल्याने परिसरातील शेताची सुपिकता वाढली.
आजूबाजूच्या गावांची भागणार तहान
येळगाव धरणातून अजिसपूर, नांद्राकोळी, साखळी बु., सागवन, कोलवड, देऊळघाट, बिरसिंगपूर, येळगाव, सुंदरखेड, भादोला, माळविहिर, अंत्री तेली, जांभरुणला येळगाव धरणातून पाणीपुरवठा होतो. ऐन उन्हाळ्यात व दुष्काळी परिस्थिती असतांनाही येळगाव धरणामुळे या गावांची तहान भागविली गेली. यावर्षी जूनमध्येच धरण १०० टक्के भरल्याने या गावातील नागरिकांची वर्षभर तहान भागविली जाणार आहे.


Web Title: Heavy rain Yelgaon dam 'overflow'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.