खामगावात नियोजित इंदिरा गांधीच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 03:21 PM2020-01-18T15:21:40+5:302020-01-18T15:21:48+5:30

नियोजित इंदिरा गांधीच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटविण्यात आल्याने, ही अतिक्रमित जागा आता मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते.

The encroachment near the Indira Gandhi statue in Khamgaon was removed | खामगावात नियोजित इंदिरा गांधीच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटविले

खामगावात नियोजित इंदिरा गांधीच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटविले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील शहर पोलिस स्टेशन समोरील अतिक्रमण नगर पालिका प्रशासनाच्यावतीने हटविण्यात आले. नियोजित इंदिरा गांधीच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटविण्यात आल्याने, ही अतिक्रमित जागा आता मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते. दरम्यान, या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आल्याने, याठीकाणी स्व. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची उभारणी करून जागेचे सौदर्यीकरण करण्याची मागणी इंदिरा गांधी स्मारक समितीच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
खामगाव शहरातील अतिक्रमणामुळे अनेक मुख्य रस्त्यांचा श्वास कोंडल्या जात आहे. अतिक्रमित जागेच्या वादातून घाटपुरी रोडवर काही दिवसांपूर्वीच दुहेरी हत्यांकाडही घडले. या पार्श्वभूमीवर नगर पालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील अतिक्रमण निमुर्लनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. शहराच्या विविध मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात येत आहे. शहरातील महात्मा गांधी उद्यानानजीक नझुल शीट नं.३३ ए प्लॉट नं.२/३ मधील ५४४० चौरस फूट जागेवर स्व. इंदिरा गांधी यांचा पुतळा उभारण्यासाठी २० फेब्रुवारी १९८५ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तत्कालीन काँग्रेस नगरसेवक तथा नगर परिषद उपाध्यक्ष अशोक ढगे यांनी स्व. इंदिरा गांधी यांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता.
यासाठी तत्कालीन खासदार स्व. मधुसुदन वैराळे यांच्याकडे पुतळ्यासाठी जागा मिळण्याासठी अर्जही सादर केला होता. दरम्यान, अतिक्रमणाच्या विळख्यामुळे स्व. इंदिरा गांधी यांचा पुतळा बसविण्याचे काम थंडबस्त्यात पडले. आता या ठिकाणी अतिक्रमण हटविण्यात आल्याने, पुतळा उभारणी आणि जागेच्या सौदर्यीकरणासाठी पुढाकार घेण्याची मागणी इंदिरा गांधी स्मारक समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
 

जागा संरक्षीत करणार!
शहरातील नझुल शीट नं.३३ ए प्लॉट नं. २/३ मधील पोलिस स्टेशन समोरील म्हणजेच स्व. इंदिरा गांधी यांच्या नियोजीत स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर या जागेला पालिका प्रशासनाच्यावतीने तारेचे कुंपण करण्यात येणार असल्याचे समजते. कुंपण आणि जागा संरक्षीत करण्याच्या दृष्टीकोनातून शुक्रवारी पालिका प्रशासनाच्यावतीने जागेची पाहणी करण्यात आली.


अतिक्रमित व्यावसायिक मुख्याधिकाऱ्यांना भेटले!
अतिक्रमण हटविण्यात आल्याने रोजगार बुडाल्याची ओरड करीत, शहर पोलिस स्टेशन समोरील काही अतिक्रमकांनी शुक्रवारी दुपारी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांची भेट घेतली. यावेळी सायंकाळच्या वेळेत हातगाड्यांवर व्यवसाय करू देण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, पालिका प्रशासनाकडून त्यांना कोणतेही सकारात्मक आश्वासन न मिळाल्याने अतिक्रमकांचा हिरमोड झाला.


वारंवार पाठपुरावा केल्यानंतर नगर पालिका प्रशासनाने स्व. इंदिरा गांधी यांच्या नियोजीत पुतळ्या जवळील अतिक्रमण हटविले आहे. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. स्व. इंदिरा गांधी यांचा पुतळा उभारणीसोबतच जागेच्या सौदर्यीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
-अशोक ढगे
माजी नगरसेवक तथा अध्यक्ष
इंदिरा गांधी स्मारक समिती, खामगाव.

Web Title: The encroachment near the Indira Gandhi statue in Khamgaon was removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.