सायबर गुन्ह्यांचा विळखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 02:40 PM2020-01-17T14:40:40+5:302020-01-17T14:41:11+5:30

जिल्ह्यात गतवर्षामध्ये सायबरचे सुमारे ३८ गुन्हे समोर आले आहेत.

 Cyber crime increased in Buldhana district | सायबर गुन्ह्यांचा विळखा!

सायबर गुन्ह्यांचा विळखा!

googlenewsNext

- सोहम घाडगे  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सायबर गुन्ह्यांच्या विळख्यात जिल्हा सापडत आहे. जिल्ह्यात गतवर्षामध्ये सायबरचे सुमारे ३८ गुन्हे समोर आले आहेत. यामध्ये आॅनलाइन फसवणूकच २३ लाख १० हजार ७८६ रुपयांपर्यंत पोहचली आहे.
सर्वसामान्यांपासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांकडूनच आज इंटरनेटचा वापर वाढला आहे. परंतू या इंटरनेटच्या अतिवापरात लोकांचा पैसा आणि गोपनियतेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही जिल्ह्यात वाढले आहे. बँकेतून बोलतोय, तुमचे एटीएम बंद होणार, पीन नंबर सांगा यासारखे फोन करून बँकेतील खात्याची माहिती घेणारे अनेक जण आज दिसून येतात. त्यांच्याकडून होणारी आॅनलाइन आर्थिक फसवणूक आज जिल्ह्यात वाढली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षभरामध्ये ३८ गुन्हे उघड झाले आहे. त्यामध्ये २३ लाख १० हजार ७८६ रुपयांची फसवणूक झाल्याचे गुन्हे बुलडाणा जिल्हा सायबर सेलकडे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सायबर सेलकडून कारवाई करण्यात येत आहे.

फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅपच्या ३२ तक्रारी
फेसबूक आणि व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मिडीयाचा वापर सध्या वाढलेला आहे. फेसबूक आणि व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून गुन्ह्यांचे प्रमाणही आज वाढले आहे. जिल्हाभरातून जवळपास ३२ तक्रारी फेसबूक आणि व्हॉट्स अ‍ॅपच्या आलेल्या आहेत. त्यातील फेसबूकवरील प्रकरणांच्या २७ तक्रारी व व्हॉट्स अ‍ॅपवरील पाच तक्रारी सायबर सेलला प्राप्त झाल्या आहेत. यातील फेसबुकवरील आलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा सायबर सेलकडून लावण्यात आला आहे. परंतू व्हॉट्स अ‍ॅपवरील तक्रारींचा निपटारा सायबर सेलही लावू शकले नाही. आवश्यक तो डाटा न मिळाल्याने जिल्ह्यातील व्हॉट्स अ‍ॅपवरील सायबर गुन्ह्यांचा तपास आतापर्यंत लागला नाही. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून महिलांचा विनयभंग, समाजात तेढ निर्माण करणे, सासारखे गुन्हे सध्या घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी सायबर सेलकडून प्रयत्न केल्या जातात.


महिलाही ठरताहेत सायबर गुन्ह्यांचे शिकार
आॅनलाइन फसवणूक किंवा व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक हॅक करणे यावरख सायबर गुन्हे थांबले नाहीत. या गुन्ह्यांचे शिकार महिलाही ठरत आहेत. जिल्ह्यात महिला संदर्भातील १० सायबर गुन्हे समोर आले आहेत. यामध्ये विनयभंग, महिलांना फोन करून किंवा मॅसेज करून त्रास देणे, यासारखे गुन्हे उघड झाले आहेत. यावरही सायबर सेल वॉच ठेऊन आहे.

ज्या नागरिकांचे आॅनलाइन एटीएमद्वारे ओटीपी शेअर करून किंवा त्यांचे संमतीशिवाय बचतखाते, क्रेडीट कार्ड किंवा पेटीएम अशा तत्सम प्रकारे रक्कम अज्ञात व्यक्ती ट्रान्सफर करतात. अशावेळी संबधित नागरिक सायबर पोलीस स्टेशनला येऊन तातडीने तक्रार नोंदवतात. त्यांची आॅनलाइन गेलेली रक्कम सायबर टीमच्यावतीने पाठपुरावा करून परत आणण्यात येते. जास्त कालावधी झाल्यानंतर अज्ञाताकडून पैसे विड्रॉल करण्यात येतात.
- प्रदीप ठाकूर, पोलीस निरिक्षक,
सायबर सेल, बुलडाणा.

 

 

Web Title:  Cyber crime increased in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.