बुलढाणा हादरले! बायको म्हणाली, 'बाहेर जा व मरून जा', शब्द जिव्हारी लागले अन् पतीने लक्ष्मीवर झोपेतच कुऱ्हाडीने केले वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:19 IST2025-12-09T13:15:51+5:302025-12-09T13:19:03+5:30
Buldhana Crime News: पती-पत्नीचा वाद झाला. रागामध्ये पत्नी म्हणाली, तू बाहेर जा आणि मरून जा.' हे शब्द जिव्हारी लागले आणि पतीने पत्नीला झोप लागताच कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केली.

बुलढाणा हादरले! बायको म्हणाली, 'बाहेर जा व मरून जा', शब्द जिव्हारी लागले अन् पतीने लक्ष्मीवर झोपेतच कुऱ्हाडीने केले वार
Buldhana Crime: रात्री पती-पत्नीमध्ये भांडण झाले. पत्नी रागाच्या भरात पतीला बोलून गेली. पण पत्नीच्या शब्द पतीला सहन झाले नाही. मनात धुमसणाऱ्या रागासमोर बोलणारी व्यक्ती आपली पत्नीच असल्याचे विसरून गेला. मध्यरात्र झाली. पत्नी झोपत असतानाच कुऱ्हाड घेतली आणि घाव घालत हत्या केली. जळगाव जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक येथे ही घटना घडली.
घरगुती वादातून अपमानित केल्याने पतीनेच गाढ झोपेत असलेल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
तू काही कामाचा नाहीस, तू...
लक्ष्मी पवन धुंदाळे (वय २४) असे मृतक महिलेचे नाव आहे. लक्ष्मी ही रात्री घरामध्ये झोपेत असताना तिचा पती पवन गजानन धुंदाळे (२८) याने तिच्या मानेवर कुन्हाडीचे वार केले. यामागे 'तू काही कामाचा नाहीस, बाहेर जा व मरून जा' असे शब्द बोलून पत्नीने अपमानित केल्याचा राग कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पतीने केलेल्या मारहाणीत लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी ग्राम पोलिस पाटील संदीप सदाशिव गटमने यांनी ८ डिसेंबर रोजी सकाळी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी पवन धुंदाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
मध्यरात्रीनंतर सासरच्यांनी दिली गावात माहिती
घटना घडल्यानंतर आरोपीचे आई-वडील घाबरून घराबाहेर पडले आणि थेट पोलिस पाटील संदीप गटमने यांच्या घरी जाऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिस पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली व जळगाव जामोद पोलिस ठाण्याला कळविले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली. ही घटना कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचे भयावह उदाहरण ठरत असून, गावात शोककळा पसरली आहे.
सात महिन्यांच्या निष्पाप जीवाचे हाल
मृतक लक्ष्मी धुंदाळे व आरोपी पवन धुंदाळे हे दोघेही शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सध्या संसारात दिवस कंठणाऱ्या य दाम्पत्याला अवघ्या सात महिन्यांची चिमुकली मुलगी आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे त्या बाळाचे मातृछत्र हरपले आहे. या कोवळ्या जिवाचा काय दोष, असा हृदयद्रावक सवाल गावात व परिसरात जनमानसातून उपस्थित केला जात आहे.
आरोपीला पोलिस कोठडी
८ डिसेंबर रोजी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. या आधीही त्यांचे छोटे-मोठे वाद झाल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले; मात्र यंदा त्याने टोकाचे पाऊल उचलले. आरोपीला अटक केल्यानंतर ८ डिसेंबर रोजी जळगाव जामोद न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.