बुलडाणा: आर्थिक वर्षाअखेर जिल्ह्यात दहा विज्ञान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:07 PM2020-02-28T12:07:12+5:302020-02-28T12:07:19+5:30

विज्ञान विषयक संकल्पनांचे सक्षमीकरण होण्यासाठी मार्च अखेर जिल्ह्यात दहा नाविन्यपूर्ण विज्ञानकेंद्र उभारण्यात येणार आहेत.

Buldana: Ten science centers in the district by the end of the financial year | बुलडाणा: आर्थिक वर्षाअखेर जिल्ह्यात दहा विज्ञान केंद्रे

बुलडाणा: आर्थिक वर्षाअखेर जिल्ह्यात दहा विज्ञान केंद्रे

Next

- नीलेश जोशी 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: माजी राष्ट्रपती कै. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय अविष्कार अभियानातंर्गत मानव विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण वाढीस लागण्यासोबतच विज्ञान विषयक संकल्पनांचे सक्षमीकरण होण्यासाठी मार्च अखेर जिल्ह्यात दहा नाविन्यपूर्ण विज्ञानकेंद्र उभारण्यात येणार आहेत. यासंदर्भात मानव विकासचे आयुक्तांनी एक कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावास गेल्या महिन्यातच मान्यता दिली असून पैकी एक कोटी ३५ लाखांचा निधी हा बुलडाणा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या निधीतून जास्त पटसंख्येच्या दहा शळांमध्ये हे विज्ञान केंद्र उभारण्यात येत आहेत.
यामध्ये प्रामुख्याने लोणार तालुक्यातील देऊळगाव वायसा, सिंदखेड राजा तालुक्यातील आडगाव राजा, शिवणी टाका, जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा, काजेगाव, चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे, मेरा खुर्द येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा, देऊळगाव राजा तालुक्यातील डोड्रा, मेहकर तालुक्यातील शेंदला आणि संग्रामपूर तालुक्यातील सगोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हे केंद्र उभारण्यात येणार आहे. मानन विकास कार्यक्रमातंर्गत जिल्हा, तालुका स्पेसिफीक योजनेतंर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्याच्या दृष्टीकोणातून ही नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र कार्यरत राहणार आहे. २०१७ दरम्यान करण्यात आलेल्या विविध शैक्षणिक सर्व्हेक्षणानंतरच्या अहवालामध्ये शैक्षणिक गुणवत्ता घसरत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, उत्साही वातावरण व मुलांना सतत क्रियाशील ठेवत त्यांच्यातील संशोधन वृत्ती विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे. केवळ वर्गात श्रवणावर भर न देता प्रत्यक्ष कृतीमधून उत्सूकता, जिज्ञासा वाढविण्यास प्रोत्साहन देणारे व उपक्रमांची संधी देणारे शिक्षण मुलांना मिळावे हा दृष्टीकोण यामध्ये ठेवण्यात आलेला आहे.


गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त
केंद्र सरकारने नऊ जुलै २०१५ रोजी माजी राष्ट्रपती कै. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय अविष्कार अभियान देशात सुरू केले होते. त्यांतर्गत शाळांमध्ये नाविन्यपूर्ण असे विज्ञान व गणिताच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सचासह प्रयोग शाळा अध्ययन अध्यापन केंद्र, शैक्षणिक सामुग्री व तंत्रज्ञानाचा उपयोग असे उपक्रम सुचित करण्यात आले होते. त्यादृष्टीने आता ही अंमलबजावणी होत आहे. मानव विकास अंतर्गत समाविष्ट तालुक्यातील ४८ शाळांनाच या केंद्रांचा लाभ झालेला आहे. त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्यात ही दहा केंद्रे देण्यात येत आहेत. यात ५२० प्रकारचे प्रयोग साहित्य, पुस्तके व विज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट करणारी उपकरणे संबंधीत शाळांमधील केंद्रामध्ये राहणार आहेत.

Web Title: Buldana: Ten science centers in the district by the end of the financial year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.