The Kashmir Files Movie Review : अस्वस्थ काश्मीरचा डॉक्युड्रामा, अनुपम खेर प्रभावी

By संदीप आडनाईक | Published: March 12, 2022 03:20 PM2022-03-12T15:20:14+5:302022-03-15T14:14:24+5:30

'द काश्मीर फाइल्स'मध्ये त्यांनी १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे

The kashmir files Movie Review | The Kashmir Files Movie Review : अस्वस्थ काश्मीरचा डॉक्युड्रामा, अनुपम खेर प्रभावी

The Kashmir Files Movie Review : अस्वस्थ काश्मीरचा डॉक्युड्रामा, अनुपम खेर प्रभावी

googlenewsNext

चित्रपट परीक्षण/ संदीप आडनाईक
कलाकार : अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार
दिग्दर्शक : विवेक अग्निहोत्री
रेटिंग: ३ स्टार

वास्तविक जीवनातील घटनांचे चित्रण करण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते सहसा सुरक्षित मार्ग स्वीकारतात. मात्र, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री थेट या विषयाला हात घालतात. द ताश्कंद फाइल्सच्या वेळीही त्यांनी तो विषय बेधडक मांडला होता. बॉक्स ऑफिसवरही त्याचा त्यांना फायदा झाला. 'द काश्मीर फाइल्स'मध्ये त्यांनी १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपट पहिल्या दृश्यापासूनच पकड घेतो. दिग्दर्शक या खोऱ्यात होत असलेल्या अन्यायाचे चित्रण करतो आणि तुम्हाला अस्वस्थ करणारे अनेक वास्तविक जीवनातील घटना एकत्र करून, ग्राफिक, भीषण क्षणांची मालिका दाखवतो.

दिग्दर्शकाने पुष्कर नाथ पंडित (अनुपम खेर) यांच्या चष्म्यातून या डॉक्युड्रामा सिनेमाचे कथानक मांडले आहे. तो स्वत:च या स्थलांतराचा साक्षीदार आणि बळी आहे. स्वत:साठीच नव्हे तर त्याच्या उरलेल्या दुःखी कुटुंबासाठी आणि संपूर्ण समाजासाठी न्याय आणि स्थिरता मिळविण्यासाठी तो खूप प्रयत्न करतो. या घटनेद्वारे, दिग्दर्शक त्यावेळच्या प्रसारमाध्यमांची आणि सरकारची भूमिका, काश्मीर खोऱ्यातील राजकारण, अन्न आणि औषधांसह एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन गरजांवर होणारा परिणाम आणि आजच्या काळातील शोकांतिकेची मांडणी या सिनेमातून करतो.

अग्निहोत्री आणि त्यांच्या टीमने या सिनेमाच्या विस्तृत संशोधनासाठी पूर्ण गुण मिळवले आहेत, मात्र पूर्वार्धात पुष्कर नाथ पंडित जितका प्रभावी होतो, तितका उत्तरार्धात कथेशी जोडण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे. त्याने एकाच वेळी अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्याच्या प्रयत्नामुळे चित्रपट गती घेत नाही. सिनेमा वास्तविक करण्याच्या प्रयत्नात दिग्दर्शकाने काही काही दृश्यांचे वर्णन 'खूप ग्राफिक' केलेले आहे. अर्थात काश्मिरी समाजाने अनुभवलेल्या अग्निपरीक्षेमुळे दिग्दर्शकाला 'न्याय' देण्याचा प्रयत्न यशस्वी करतो. चित्रपटाचे चित्रीकरण काश्मीरमध्ये करण्यात आले आहे आणि लोकेशनवर शूट केल्याने कथानकात अधिक सत्यता आणि भावना जोडण्यात मदत होते. चित्रपटाची गती काहीशी संथ झाली असली तरी एकूण सिनेमा प्रभावशाली ठरला आहे. सिनेमातील संवाद काश्मीरशी नाते सांगते. त्यामुळे अनेकदा उपशीर्षकांचा आधार घ्यावा लागतो.

अभिनयाबद्दल सांगायचे तर अनुपम खेर यांचा नेहमीप्रमाणेच प्रभावी आहे. त्यांनी भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. चित्रपटात पुष्कर नाथ पंडित यांच्या आणि नंतर त्यांचा नातू कृष्णाच्या (दर्शन कुमारने साकारलेला) प्रवासात मिथुन चक्रवर्ती, पुनीत इस्सार, प्रकाश बेलावाडी आणि अतुल श्रीवास्तव यांनी साकारलेली इतर चार पात्रे महत्त्वाची भूमिका निभावणारी आहेत. चारही जणांनी आपापल्या परीने भूमिका साकारली आहे. विशेषतः कृष्णासोबतच्या एका द्वंद्वात्मक प्रसंगात मिथुन चक्रवर्ती यांची अभिनयाची उंची दिसून येते.

दर्शनकुमारने त्याची भूमिका उत्तमरीत्या पार पाडली आहे. विशेषतः क्लायमॅक्समध्ये त्याचा अभिनय खऱ्या अर्थाने समोर येतो. पल्लवी जोशीने राधिकाची भूमिका अप्रतिम साकारली आहे. इतर सहायक कलाकार देखील त्यांच्या कुवतीनुसार अभिनय करतात. एकूण 'द काश्मीर फाइल्स'मध्ये मुख्यत्वे दुसऱ्या बाजूचा अभाव आहे, परंतु काश्मिरी हिंदूंची दुर्दशा आणि ते अजूनही अनुभवत असलेले दु:ख मांडण्यात विवेक अग्निहोत्री यशस्वी ठरले आहेत.

Web Title: The kashmir files Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.