Tanushree Dutta’s harassment case agianst Nana patekar loses its way; Witnesses unable to recall the incident | तनुश्री दत्ता-नाना पाटेकर प्रकरणाला मिळाले नवे वळण, साक्षीदारांना आठवत नाहीये घटनाक्रम?
तनुश्री दत्ता-नाना पाटेकर प्रकरणाला मिळाले नवे वळण, साक्षीदारांना आठवत नाहीये घटनाक्रम?

ठळक मुद्देमुंबई पोलिसांनी आतापर्यंत गणेश आचार्य, डेझी शाह यांच्यासोबतच काही बॅकस्टेज आर्टिस्टचा देखील जबाब नोंदवला आहे. पण यामधील कोणालाच दहा वर्षांपूर्वी काय घडले होते हे आठवत नाहीये.

२००८ साली 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले होते असा आरोप तनुश्री दत्ताने गेल्या वर्षी केला होता. पण आता तनुश्री आणि नाना यांच्या या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. २००८ साली चित्रपटाच्या सेटवर काय घडले हेच अनेक साक्षीदारांना आठवत नसल्याचे वृत्त मिड डे या वर्तमानपत्राने दिले आहे. त्यांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे की, नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणात पोलिसांनी १०-१२ साक्षीदारांचे जबाब आतापर्यंत नोंदवले आहेत. पण यामधील कोणालाच त्या दिवशी काय काय घडले याचा घटनाक्रम आठवत नाहीये.

त्यांच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी आतापर्यंत गणेश आचार्य, डेझी शाह यांच्यासोबतच काही बॅकस्टेज आर्टिस्टचा देखील जबाब नोंदवला आहे. पण यामधील कोणालाच दहा वर्षांपूर्वी काय घडले होते हे आठवत नाहीये. तर दुसरीकडे हे साक्षीदार नाना पाटेकर यांच्याच बाजूने असल्याचे तनुश्रीने म्हटले आहे. त्यामुळे या साक्षीदारांची साक्ष आणि माझा जबाब यात तफावत असणारच असा दावा तनुश्राने केला आहे. माझा छळ झाला असून तो सिद्ध करण्यासाठी मला कोणत्याही साक्षीदाराची गरज नाहीये असे देखील तनुश्रीने म्हटले आहे. 

नेमके काय आहे प्रकरण?
'हॉर्न ओके प्लीज' सिनेमातील एका गाण्याचं शुटिंग सुरू असताना नाना पाटेकरांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. कोरिओग्राफरला दूर सारत डान्स स्टेप्स कशा कराव्यात हे दाखवण्याचा अट्टहास नाना करत होते, असे तनुश्रीने म्हटले होते. चित्रपटातील करारानुसार संबंधित गाणं सोलो होते, पण नानांना माझ्यासोबत इंटिमेट सीन करायचा होता, असा गंभीर आरोपही तिने केला होता. ''कोरिओग्राफर मला स्टेप शिकवत असताना ते मध्येच येत, माझा हात पकडत. मी त्यांच्या या वागण्याला वैतागली होती आणि याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांकडे तक्रार केली होती. याचा परिणाम म्हणजे, मला या प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले. आजही ती घटना आठवली की दचकायला होते, असा गंभीर आरोप तिने केला होता. एवढंच नव्हे तर माझ्यासोबतच नाही तर अन्य काही अभिनेत्रींसोबत गैरवर्तन करूनही नाना चित्रपटसृष्टीत काम करत असल्याबद्दल तिने संताप व्यक्त केला होता. कोणीही घाबरून नानाविरोधात बोलत नसल्याचंही तिने म्हटले होते. 


Web Title: Tanushree Dutta’s harassment case agianst Nana patekar loses its way; Witnesses unable to recall the incident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.