ठळक मुद्देतब्बू आणि इशान या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर अ सुटेबल बॉय या सिरिजचा पहिला लूक शेअर केला आहे. यात दोघे एका रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

तब्बूने आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आता ती मीरा नायरच्या अ सुटेबल बॉय या सिरिजमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिरिजमध्ये इशान खट्टर तिच्या नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विक्रम सेठ यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ही सिरिज असून यात तब्बू सईदा बाई तर इशान मान कपूरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिरिजमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा काळ दाखवला जाणार आहे. यात चार कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून यात अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

तब्बू आणि इशान या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर या सिरिजचा पहिला लूक शेअर केला आहे. यात दोघे एका रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. केवळ सामान्य लोकांनाच नव्हे तर इंडस्ट्रीतील लोकांना देखील या सिरिजचा पहिला लूक प्रचंड आवडत असून ते कमेंटच्या माध्यमातून याविषयी सांगत आहेत. यात तब्बू आणि इशानसोबतच रसिका दुग्गल, शेफाली शहा, तान्या मानिकताला, विजय वर्मा, रणदीप हुडा, राम कपूर, विजय राज यांच्या मुख्य भूमिका असून याचे चित्रीकरण भारतातील विविध भागांमध्ये झाले आहे.

तब्बूने याआधी मीरा नायरसोबत नेमसेकमध्ये काम केले होते. ती पुन्हा मीरासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे तिने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले होते. तिने काही दिवसांपूर्वी या सिरिजच्या टीमसोबतचा फोटो पोस्ट करून न्यू बिगिनिंग असे लिहिले होते. 

इशान पहिल्यांदाच मीरा आणि तब्बूसोबत काम करत आहे. तो त्या दोघींसोबत काम करण्यास खूप खूश आहे. या सिरिजचा पहिला लूक येण्याआधी त्याने तब्बू आणि मीराचा एक फोटो पोस्ट करत एका नव्या प्रवासाला सुरुवात असे लिहिले होते. 

तब्बू गेली अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये काम करत असून तिने एक बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. तिची मोठी बहीण फराह नाझ देखील अभिनेत्री असून तब्बू लहान असताना अनेकवेळा बहिणीसोबत चित्रपटाच्या सेटवर येत असे. तब्बूने बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर कुली नं. १ या तेलगु चित्रपटाद्वारे एक नायिका म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आज तिने बॉलिवूडमध्ये तिची एक जागा निर्माण केली आहे. 

Web Title: A Suitable Boy First Look: Ishaan Khatter Is Mesmerised By Tabu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.