ठळक मुद्देमी एका चित्रपटात काम करत होते. त्या चित्रपटाचे असोसिएट डायरेक्टर रवी होते. मी पहिल्याच भेटीत त्यांच्या प्रेमात पडले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले आहे. कही किसी रोज या मालिकेत त्यांनी साकारलेली रमोला सिंकंद ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. त्या एक चांगल्या अभिनेत्री असण्यासोबतच एक खूपच चांगल्या डान्सर आहेत. त्या गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असल्या तरी त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे. 

सुधा चंद्रन यांचे लग्न रवी डंग यांच्यासोबत झाले असून ते देखील बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. ते गेली अनेक वर्षं असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. सुधा आणि रवी यांच्या प्रेमकथेविषयी सुधा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, मी एका चित्रपटात काम करत होते. त्या चित्रपटाचे असोसिएट डायरेक्टर रवी होते. मी पहिल्याच भेटीत त्यांच्या प्रेमात पडले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी चित्रपटाच्या सेटवर सगळ्यात पहिल्यांदा गेले, त्यावेळी मी सगळ्यांना जाऊन भेटले, सगळ्यांना हाय-हॅलो करताना मी त्यांच्याशी देखील बोलायला गेले. पण ते कामात व्यग्र असल्याने त्यांनी माझ्या हायला प्रतिसाद दिला नाही. त्यावर तुम्ही असे का वागलात असे मी लगेचच त्यांना विचारले होते. त्यावर माझ्या प्रोटोकॉलमध्ये तुम्हाला विश करणे येत नाही अस म्हणत ते पुन्हा कामात बिझी झाले होते. मला त्यांची हीच गोष्ट प्रचंड आवडली. कामाप्रती त्यांच्या असलेल्या निष्ठेच्या मी प्रेमात पडले. त्यांना खरे तर जास्त बोलायला आवडतच नाही. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मला सांगितले की, त्यांची बहीण माझी खूप मोठी फॅन असून तिला मला भेटायचे आहे. त्यानंतर बहिणीसोबतच मी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भेटले. मला त्यांचे संपूर्ण कुटुंबच प्रचंड आवडले. त्याचदरम्यान आमची खूप चांगली मैत्री झाली. मी अभिनयक्षेत्रात स्ट्रगल करत होते. मी दिवसाला अनेक ऑडिशन्स द्यायचे. त्यावेळी ते देखील माझ्या सोबत यायचे. काहीच दिवसांत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो.

आपल्या प्रेमकथेविषयी सुधा पुढे सांगतात, आम्ही लग्नाचा विचार केल्यानंतर आमच्या कुटुंबियांना याबद्दल सांगितले. पण मी माझ्या जातीतील मुलाशी लग्न करावे आणि त्यातही तो मुलगा चित्रपटसृष्टीशी संबंधित नसावा अशी माझ्या आईची इच्छा होती. मी देखील आईला सांगितले होते की, तुझ्या आशीर्वादाशिवाय मी लग्नच करणार नाही. त्यानंतर काही वर्षांनी माझी आई आमच्या लग्नासाठी तयार झाली आणि आम्ही एका देवळात लग्न केले.


Web Title: Sudha Chandran said I married my husband Ravi in a temple
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.