ठळक मुद्दे2002 मध्ये त्याचे नशीब फळफळले. ‘शहीद ए आजम’ हा सिनेमा त्याला मिळाला. 

भारतात कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या काळात एक नाव सतत चर्चेत आहे, ते म्हणजे अभिनेता सोनू सूद याचे. भुकेल्या, खचलेल्या आणि आपल्या गावी जाण्यास अगतिक असलेल्या हजारो मजूरांना त्याने मदतीचा हात दिला. शेकडो किमीची पायपीट करत घरी निघालेल्या स्थलांतरीत मजूरांसाठी सोनूने बसेसची व्यवस्था केली. मदत मागणा-या प्रत्येकासाठी सोनू रात्रंदिवस खपत आहे. प्रत्येक मजुराला त्याच्या घरी सुरक्षित पोहोचण्यासाठी धडपडतो आहे. पडद्यावर भलेही सोनू सूदने खलनायकाच्या भूमिका रंगवल्या असतील पण या कामामुळे तूर्तास तरी सोनू सूद हा सगळ्यांचा हिरो झाला आहे. सोशल मीडियावर लोक त्याला ‘लॉकडाऊन हिरो’ म्हणून संबोधत आहेत.

सोनू सूद हा मुळचा पंजाबच्या मोगाचा आहे. मोगा येथे सोनूच्या वडिलांचे कपड्यांचे दुकान होते. ज्याचे नाव होते, ‘बॉम्बे क्लॉथ हाऊस’. सोनू आई मात्र प्रोफेसर होती. आपल्या मुलाने चांगले काही करून नाव कमवावे, अशी तिची इच्छा होती. त्यामुळे सोनूला इंजिनिअर बनवण्यासाठी तिने त्याला नागपुरात पाठवले. पण सोनूला त्याच्यातील अभिनयाचा किडा स्वस्थ बसू देईना. सोनू इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर झाला खरा पण अभिनेता बनण्याचे स्वप्न त्याला सारखे खुणावत होते. अखेर त्याने निश्चय केलाच. मला फक्त दीड वर्ष दे. या दीड वर्षात काहीही जमले नाही तर मी पापाच्या दुकानात बसेल, असे आईला वचन देऊन सोनू मुंबईत आला आणि स्ट्रगल सुरु झाला.

एका फ्लॅटमध्ये 5-7 मित्रांसोबत सोनू राहत होता. ऑडिशनवर ऑडिशन देण्याचे सिलसिला अखंड सुरु होता. पण प्रत्येकठिकाणी त्याला नकार मिळत होता. एकाठिकाणी सोनूने स्वत:चे फोटो पाठवले आणि त्याची लॉटरी लागलीच. साऊथच्या एका सिनेमासाठी तू सिलेक्ट झाला आहे, असा कॉल सोनूला आला. खरे तर सोनूला बनायचे होते हिंदी सिनेमाचा हिरो. मात्र हाताला काम नव्हते, जवळचे पैसे संपले होते. अशात बिचारा काय करणार. हिंदी नाही तर साऊथचा सिनेमाच करू, म्हणून सोनू ऑडिशनसाठी पोहोचला.

ऑडिशन सुरु झाले आणि शर्ट काढ, असे सोनूला सांगण्यात आले. यावर भाई, शर्ट क्यों उतरवा रहे हो, असा प्रश्न सोनूने केला. पण रोल हवा तर शर्ट काढ, असे त्याला सुनावण्यात आले. बिच्चारा सोनू यासाठीही तयार झाला आणि त्याने शर्ट काढले. मात्र शर्ट काढताच जणू चमत्कार झाला. सोनू भैय्याची बॉडी पाहून प्रोड्यूसर, दिग्दर्शक सगळेच त्याची तारीफ करायला लागले. बॉडीच्या जोरावर सोनू सिलेक्ट झाला.
सोनूने तामिळ सिनेमा केला. यानंतर तेलगू सिनेमा केला. पण हिंदी सिनेमा काही मिळेना.  साऊथ इंडस्ट्रीत दोन वर्षे काम केल्यानंतरही हिंदी सिनेमात झळकण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशी चिन्हे दिसेणात. मात्र म्हणतात ना, सब्र का फल मिठा होता है.

2002 मध्ये त्याचे नशीब फळफळले. ‘शहीद ए आजम’ हा सिनेमा त्याला मिळाला. या हिंदी सिनेमात सोनूने शहीद भगत सिंगची भूमिका साकारली. मग काय मोगाचा हा पोरगा असा काही चमकला की, यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
  त्यानंतर त्याने  कहां हो तुम, युवा, शीशा, आशिक बनाया आपने, जोधा अकबर, एक विवाह ऐसा भी, दबंग,  बुड्ढा होगा तेरा बाप,   आर...राजकुमार आणि  हॅप्पी न्यू ईअर यासारख्या अनेक सिनेमांत त्याने काम केले. यापैकी ‘दबंग’मध्ये त्याने साकारलेली ‘छेदी सिंह’ची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.

तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल पण आधी सोनूने ‘दबंग’ नाकारला होता. ही भूमिका मला जमणार नाही, असे म्हणत त्याने यात काम करण्यास नकार दिला होता. पण सलमान भाईला सोनूच हवा होता. अखेर सोनू तयार झाला पण एका अटीवर. होय, मला माझ्या भूमिकेत काही बदल करायचे आहेत, असे त्याने स्पष्टपणे सांगितले. त्यानुसार सोनूने या भूमिकेत काही बदल केले आणि छेदी सिंह हिट झाला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sonu sood struggle story, know about actor-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.