या कारणामुळे स्मिता पाटीलवर मीडियाने केली होती टीका...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2016 11:05 AM2016-12-13T11:05:42+5:302016-12-13T12:24:37+5:30

काही लोक काळाच्या चौकटीत बांधले जाऊ शकत नाही. ते गेल्यावरही आपल्या आठवणींमध्ये ते कायम जिवंत असतात. असेच एक नाव ...

Smita Patil had criticized the media for this reason ... | या कारणामुळे स्मिता पाटीलवर मीडियाने केली होती टीका...

या कारणामुळे स्मिता पाटीलवर मीडियाने केली होती टीका...

googlenewsNext
ही लोक काळाच्या चौकटीत बांधले जाऊ शकत नाही. ते गेल्यावरही आपल्या आठवणींमध्ये ते कायम जिवंत असतात. असेच एक नाव म्हणजे स्मिता पाटील. चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिताना त्यांची दखल केवळ एक अभिनेत्री म्हणून नाही तर एक पर्व म्हणून घ्यावी लागेल.

घायाळ करणारे हास्य, भूमिकेच्या अंतरंगात डोकावून बघणारे डोळे, हृदयाचा ठाव घेणारे सौंदर्य आणि निडर व्यक्तीमत्त्वाचे वैभव लाभलेल्या स्मिता पाटील एक परिपूर्ण अभिनेत्री होत्या आणि आजही आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेले सर्वच दिग्दर्शक मान्य करतात की, त्यांच्यासारखी दुसरी अभिनेत्री होणे नाही. त्यांच्या अभिनयाची उंची गाठणारी अभिनेत्री अजून तरी कोणी नाही.

भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये नाव कोरणाऱ्या या अभिनेत्रीने वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी ‘एक्झिट’ घेतली. आज त्यांचा (दि. १३) स्मृतिदिन. त्यांना जाऊन आता ३० वर्षे झाली; परंतु सिनेमासृष्टीतील त्यांच्या योगदानाचे आजही स्मरण केले जाते. 

त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या काही आठवणींना दिलेला हा उजाळा...

१. ‘भूमिका’, ‘चक्र’, ‘अर्थ’, ‘मिर्च मसाला’ यासारख्या अनेक अभिजात चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. सामाजिक कार्यकर्ता असणारे त्यांचे वडील राजकीय वर्तुळात सक्रीय होते.

Smita Patil
लिजेंड : स्मिता पाटील

२. शिकत असतानाचा त्यांना चित्रपटांत घेण्यासाठी मोठे-मोठे दिग्दर्शक उत्सुक होते. मनोज कुमार यांनी ‘रोटी, कपडा और मकान’साठी त्यांना रोल आॅफर केला होता तर देव आनंदसुद्धा ‘हरे राम हरे कृष्णा’मध्ये त्यांना कास्ट करण्यास इच्छुक होते. परंतु शिक्षण पूर्ण होऊ देण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने या आॅफर्स नाकारल्या.

३. पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’ (एफटीआयआय) येथून अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर स्मिता यांनी दूरदर्शनवर बातमी समालोचक (न्यूज अँकर) म्हणून करिअरला सुरुवात केली.

३. अखेर १९७५ साली श्याम बेनेगल यांच्या ‘चरणदास’मधून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. सत्तरचे दशक राजकीय सिनेमांचा काळ म्हणून प्रसिद्ध आहे. स्मिता या काळाची साम्राज्ञी होती.

४. केवळ दहा वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी ७५ हून अधिक हिंदी व मराठी सिनेमांत काम केले. ‘भूमिका’ आणि ‘चक्र’ या सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच १९८५ साली त्यांना ‘पद्मश्री’सुद्धा बहाल करण्यात आला.

५. ‘कलात्मक सिनेमांची अभिनेत्री’ असा टॅग पुसत त्यांनी कालांतराने मेनस्ट्रीम हिंदी सिनेमेदेखील स्वीकारण्यास सुरुवात केली. राज खोसला, रमेश सिप्पी आणि बी. आर. चोप्रासारख्या दिग्दर्शकांबरोबर त्यांनी लोकप्रिय हिंदी चित्रपटांत काम केले. अमिताभ बच्चनसोबत केलेला ‘नमक हलाल’ सिनेमा सर्वाधिक हिट ठरला.

Smita Patil
स्त्रीवादी :स्मिता पाटील

६. महिलांच्या हक्कांविषयी काम करणाऱ्या ‘वुमेन्स सेंटर’च्या स्मिता सक्रीय सदस्या होत्या. स्त्रीवादी भूमिकांना महत्त्व देणारे चित्रपट स्वीकारण्यावर त्यांचा भर असे. ‘चॅरिटी’साठीसुद्धा त्या प्रसिद्ध होत्या. आपल्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराची रक्कम त्यांनी सामाजिक कार्यासाठी दान केली होती.

७. सामान्य मुलीप्रमाणे त्यांचेसुद्धा योग्य जोडीदारासोबत संसार करण्याचे स्वप्न होते. परंतु ‘प्रेमा’मुळे त्यांना कायमच त्रास सहन करावा लागला. लग्न झालेल्या राज बब्बरच्या त्या प्रेमात पडल्या. दोघांनी ‘तजुर्बा’, ‘भीगी पलके’, ‘अवाम’, ‘आज की आवाज’, ‘हम दो हमारे दो’सह इतर अनेक सिनेमांत एकत्र काम केले होते.

८. वैवाहिक अभिनेत्यासोबतच्या प्रेमसंबंधामुळे मीडियाने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ‘स्त्रीवादी’ स्मिता पाटील यांना घर फोडणारी महिला ठरवण्यात आले. त्यांच्या स्वत:च्या कुटुंबाचासुद्धा राज बब्बरशी असलेल्या नात्याला विरोध होता. पण वेळेनुसार हे सर्व ठीक होईल असा त्यांना विश्वास वाटायचा.

९. अखेर सर्व व्यत्यय आणि विघ्न पार करून दोघांनी विवाह केला; पण मनावर झालेले घाव परत कधीच भरले गेले नाही. सेटवर नेहमी आनंदी, उत्साही राहणारी स्मिता आता शांत आणि उदास झाली होती. राज बब्बरशी असलेले लग्न मोडून मुलासह बाहेर पडण्याचाही त्यांचा विचार होता. पण नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते.

Smita Patil And Raj Babbar
विवादित कपल :स्मिता पाटील आणि राज बब्बर

१०. आई होण्याची चाहुल लागताच त्यांचा हरवलेला ‘चार्म’ परत आला. मातृत्त्वाचा संपूर्ण आनंद घेण्याची त्या तयारी करत होत्या. पण मुलाला जन्म दिल्यानंतर लगेच दोन आठवड्यांत त्यांचे दु:खद निधन झाले. त्यानंतर राज बब्बर यांनी पहिल्या पत्नीशी पुन्हा संसार सुरू केला.

११. त्यांचा मुलगा प्रतीकचा सांभाळ स्मिताच्या आईवडिलांनी केला. अनेक वर्षे प्रतीक त्याच्या आईबद्दल बोलायचे टाळायचा. आईचे चित्रपट पाहायचा नाही. वडीलांसोबत तर तो कायम अंतर राखून असतो.

१२. सध्या प्रतीक बॉलीवूडमध्ये अभिनेता म्हणून काम करतो. तो वडीलांचे नाव आणि आडनाव लावत नाही.  केवळ ‘प्रतीक’ म्हणून तो स्वत:ची ओळख सांगतो.

Web Title: Smita Patil had criticized the media for this reason ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.