Salaam Venky Movie Review : पास की फेल? कसा आहे अभिनेत्री काजोलचा 'सलाम वेंकी' चित्रपट

By संजय घावरे | Published: December 9, 2022 06:01 PM2022-12-09T18:01:06+5:302022-12-09T18:01:56+5:30

Salaam Venky Movie Review : जाणून घ्या कसा आहे अभिनेत्री काजोलचा 'सलाम वेंकी' चित्रपट

Salaam Venky Movie Review : Pass or Fail? How is actress Kajol's 'Salam Venki' movie? | Salaam Venky Movie Review : पास की फेल? कसा आहे अभिनेत्री काजोलचा 'सलाम वेंकी' चित्रपट

Salaam Venky Movie Review : पास की फेल? कसा आहे अभिनेत्री काजोलचा 'सलाम वेंकी' चित्रपट

googlenewsNext

कलाकार : काजोल, विशाल जेठवा, प्रकाश राज, राहुल बोस, राजीव खंडेलवाल, आहना कुमरा, कमल सदाना, आमिर खान
दिग्दर्शिका : रेवती
निर्माता : सूरज सिंह, श्रद्धा अग्रवाल, वर्षा कुकरेजा
शैली : रिअल लाईफ ड्रामा
कालावधी : दोन तास १६ मिनिटे
स्टार - साडे तीन स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे

'जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नही...' असं म्हणत काही चित्रपट आपलं दु:ख विसरून इतरांना आनंद देण्याचा मंत्र शिकवतात. हा चित्रपट मृत्यूशय्येवर असलेल्या एका मुलाची गोष्ट सांगतो, ज्याला मृत्यूपश्चातही जगायचं आहे. त्याला साथ देण्याची इच्छा असूनही न्यायव्यवस्था जेव्हा हतबल होते, तेव्हा खऱ्या अर्थानं वेंकीच्या विचारांना आणि त्याच्या आईला नकळतपणे सलाम करावासा वाटतो. अशा असंख्य रुग्णांना वेदनामुक्त करणारा कायदा कधी येणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

कथानक : चैतन्यशील वेंकटेश म्हणजेच वेंकी व जिद्द आणि चिकाटीची साक्षात मूर्ती असलेली त्याची आई सुजाताची ही खरीखुरी गोष्ट आहे. जन्मजात एका दुर्धर आजाराने ग्रासलेल्या वेंकीच्या मसल्सची वाढ होत नसल्यानं हळूहळू अपंग बनतो. साक्षात मृत्यू समोर दिसत असतानाही फिल्मी स्टाईलनं जीवन जगण्यावर विश्वास ठेवणाऱ्या वेंकीला अवयव दान करायचे असतात. सुरुवातीला त्याची आई या विरोधात असते, पण नंतर तीसुद्धा तयार होते, पण कायदा साथ देत नसतो. यासाठी ते लढायचं ठरवतात. यात त्यांना डॅाक्टरांपासून, वकील आणि पत्रकार सर्वच जण साथ देतात, पण अखेरीस काय घडतं ते चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : 'देणाऱ्याने देत जावे...' या विंदा करंदीकरांच्या ओळीसारखं जीवन जगणाऱ्या वेंकटेशची वास्तवदर्शी गोष्ट कुठेही अतिरंजतीतपणा न करता दिग्दर्शिका रेवती यांनी मांडली आहे. वेंकीच्या जीवनातील टप्पे, आई-वडीलांमधील वाद, आजाराचं विश्लेषण, गुरूंचा उपदेष, कोर्ट ड्रामा आणि एक छोटीशी निरागस लव्हस्टोरी पटकथेत चांगल्या रितीनं बांधण्यात आली आहे. संवाद खूप छान आहेत. वेंकीचा उत्साही, मनमिळावू, समाधानी आणि कोणत्याही संकटावर हसत मात करण्याचा स्वभाव अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे. वेंकीला पाहिल्यावर आपल्या जीवनातील दु:ख काहीच नसल्याची जाणीव होईल. आमिर खानचं कॅरेक्टर नेमकं कशासाठी आणि ते गरजेचं होतं का ते उलगडत नाही. चित्रपटातील काही प्रसंग खूप भावूक करणारे आहेत. अफलातून कॅमेरावर्क, निसर्गसौंदर्य, अर्थपूर्ण गाणी, कलादिग्दर्शन आहे. परफेक्ट कास्टिंगसाठी १०० गुण आहेत. गीत-संगीत, कॅमेरावर्क, कलादिग्दर्शन, पार्श्वसंगीत चांगलं आहे. संकलनात थोडी कात्री चालवायला हवी होती.

अभिनय : विशाल जेठवाखेरीज अन्य कोणीही इतक्या सुरेखपणे वेंकी साकारू शकला नसता. त्याचं हसणं, अवखळपणे वागणं, थट्टा-मस्करी करणं हास्य फुलवतं आणि अम्मा म्हणून मारलेली आर्त हाक काळजाला भिडते. काजोल ग्रेट अभिनेत्री असून पुन्हा एकदा तिनं अफलातून अभिनय केला आहे. राहुल बोसनं साकारलेला वकील आणि त्याच्या विरोधातील प्रियमणी छान झाले आहेत. न्यायाधीशांच्या भूमिकेत प्रकाश राज यांनी जीव ओतला आहे. आहना कुमरानं साकारलेली पत्रकार मनाला भावते. राजीव खंडेलवालच्या रूपातील डॅाक्टरही चांगला झाला आहे. आमिर खाननं छोटीशी रहस्यमयी व्यक्तिरेखाही सुरेखरीत्या साकारली आहे. कमल सदाना बऱ्याच वर्षांनी दिसला. 

सकारात्मक बाजू : पटकथा, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत, कास्टिंग, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू : मसालेपटांच्या चाहत्यांची निराशा होईल, संकलन
थोडक्यात : चंदनाप्रमाणे झिजल्यानंतरही आपल्या देहातील अवयव इतरांच्या कामी यावेत आणि मृत्यूपश्चातही आपल्या अस्तित्वाचा सुगंध आसमंतात दरवळत रहावा हि शिकवण देणारा हा चित्रपट एकदा अवश्य पहायला हवा.

Web Title: Salaam Venky Movie Review : Pass or Fail? How is actress Kajol's 'Salam Venki' movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.