ठळक मुद्देमल्हारच्या लग्नाबाबतची एक इच्छा नाना पाटेकर यांनी या सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त केली. नाना यांनी सांगितले की, अशाच एखाद्या सामूहिक विवाह सोहळ्यात मी माझ्या मुलाचे म्हणजेच मल्हारचे लग्न करणार आहे. 

नाना पाटेकर यांनी आज मराठी, बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अग्निसाक्षी, क्रांतीवीर या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्यांना आजवरच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले असून त्यांच्या अभिनयाचे अनेक फॅन्स आहेत. 

नाना अभिनयासोबतच आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नाम फाऊंडेशन मार्फत नेहमीच समाजोपयोगी कामं केली जातात. नानांच्या याच फाऊंडेशनने आणि भाईश्री नाम फाऊंडेशनने नुकतेच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात 48 जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आले. या नवविवाहित जोडप्यांना मंगळसूत्र, पैजण आणि काही संसार उपयोगी साहित्य देण्यात आलं. नाम फाऊंडेशनच्या वतीने या विवाह सोहळ्याला नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे दोघे देखील उपस्थित होते. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने नाना यांनी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.

नाना पाटेकर यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत झालेले आहे. नीलकांती आणि नाना यांना मल्हार हा मुलगा असून गेल्या अनेक वर्षांपासून नाना आणि नीलकांती वेगळे राहातात. मल्हार हा त्याच्या वडिलांचा खूपच लाडका असून त्याला त्याच्या वडिलांसोबतच अनेक कार्यक्रमात देखील पाहायला मिळते. मल्हारच्या लग्नाबाबतची एक इच्छा नाना पाटेकर यांनी या सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त केली. नाना यांनी सांगितले की, अशाच एखाद्या सामूहिक विवाह सोहळ्यात मी माझ्या मुलाचे म्हणजेच मल्हारचे लग्न करणार आहे. 

नाना हे बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते असल्यामुळे त्यांच्या मुलाचे धुमधडाक्यात लग्न होणार असेच सगळ्यांना वाटत असणार. पण मल्हारचे लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे नाना यांनी ठरवले आहे. मल्हार हा इतर स्टार किडपेक्षा खूपच वेगळा आहे. तो नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहाणेच पसंत करतो. तसेच इतर स्टार किडप्रमाणे तो सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह नाहीये. त्यामुळे त्याच्याविषयी खूपच कमी लोकांना माहिती आहे. नाना आणि मल्हार यांच्यात खूप छान बॉण्डिंग असून ते दोघे एखाद्या मित्राप्रमाणेच राहातात. 


 


Web Title: Nana Patekar Wishes To Marry Son Malhar In Communal Marriage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.