Nana Patekar disclosed that he had contested elections, saying that ... | नाना पाटेकर यांनी निवडणूक लढवण्याबाबत केला खुलासा, म्हणाले की...
नाना पाटेकर यांनी निवडणूक लढवण्याबाबत केला खुलासा, म्हणाले की...

सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत असून यंदाच्या लोकसभा निवडणूक मराठी चित्रपटसृष्टीतील कोण कोण कलाकार निवडणुकीत उभे राहणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. यंदा डॉ. अमोल कोल्हे व उर्मिला मातोंडकर निवडणूक लढवणार आहेत. त्यात अभिनेते नाना पाटेकर देखील निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र याबाबतचा खुलासा नाना पाटेकर यांनी सोशल मीडियावर केला आहे.
नाना पाटेकर यांनी सांगितले की, 'नाम फाऊंडेशनच्या कामा निमित्त गावोगावी फिरताना अनेक लोक भेटायला येतात आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात. काही मंडळी अशा फोटोंचा गैरवापर करीत आहेत. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला मी पाठिंबा दिलेला नाही'. नाना यांनी ट्विटवर आपण निवडणूक लढवत नसल्याचे सांगून चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 
नाना पाटेकर यांच्यावर मीटू मोहिमे अंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ताने अनेक आरोप केले होते. नाना पाटेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र त्यानंतर 'हाऊसफुल ४' चित्रपटाच्या निर्मात्यांनी नानांसोबत काम करण्यास नकार दिला होता. या आरोपांनंतर नाना हिंदी चित्रपटात दिसले नाहीत. परंतु, आता सूत्रांकडून समजते आहे की लवकरच ते तेलगू इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर तेलगू चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या 'नन्ना नेनू' या चित्रपटात नाना नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नाना पाटेकर यांच्या संपर्कात असून, लवकरच या भूमिकेसाठी त्यांना निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 


Web Title: Nana Patekar disclosed that he had contested elections, saying that ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.