प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू बघायला आवडतं-जावेद जाफरी

By अबोली कुलकर्णी | Published: October 31, 2018 04:48 PM2018-10-31T16:48:04+5:302018-10-31T16:48:42+5:30

अभिनयाचा कुठलाही प्रकार कमी महत्त्वाचा नसतो. अभिनय जोपर्यंत एक कलाकार एन्जॉय करत नाही, तोपर्यंत तो प्रेक्षकांनाही एन्जॉय करायला भाग पाडत नाही,’ असे मत अभिनेता जावेद जाफरी यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केले.

 Likes to see the smile on the audience's face: Javed Jafri | प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू बघायला आवडतं-जावेद जाफरी

प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू बघायला आवडतं-जावेद जाफरी

googlenewsNext

अबोली कुलकर्णी

‘धमाल सीरिज’, ‘बँग बँग’,‘जजंतरम ममंतरम’ अशा वेगवेगळया चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारा अष्टपैलू कलाकार म्हणजे अभिनेता जावेद जाफरी. गंभीर भूमिकांबरोबरच त्याने अनेक विनोदी भूमिकाही केल्या आहेत. ‘प्रत्येकाच्या आयुष्यात एवढ्या अडचणी, समस्या आहेत की, मला विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना हसवायला आवडतं. खरंतर कलाकार म्हणून तेच माझं परमकर्तव्य आहे. अभिनयाचा कुठलाही प्रकार कमी महत्त्वाचा नसतो. अभिनय जोपर्यंत एक कलाकार एन्जॉय करत नाही, तोपर्यंत तो प्रेक्षकांनाही एन्जॉय करायला भाग पाडत नाही,’ असे मत अभिनेता जावेद जाफरी यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केले. ‘लुप्त’ या आगामी हॉरर चित्रपटातून जावेद जाफरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही हितगुज...
                           
* ‘लुप्त’ या हॉरर चित्रपटात तुम्ही दिसणार आहात. काय सांगाल हर्ष टंडन या व्यक्तिरेखेविषयी?  
- मी साकारलेला हर्ष टंडन हा अत्यंत स्वार्थी, महत्त्वाकांक्षी, संकुचित मनोवृत्तीचा असतो. त्याचे संपूर्ण लक्ष  त्याच्या व्यवसायावरच असते. व्यवसाय किती आणि कसा मोठा होईल? याकडे तो जास्त लक्ष देत असतो. कुटुंबासाठी त्याच्याकडे वेळ नाहीये. त्याला आजार होतो, तेव्हा डॉक्टर त्याला सांगतात की, तुम्ही काम करू शकणार नाही. तेव्हाही तो स्वत:च्या फायद्यासाठी तिथून सुटका मिळवतो आणि कुटुंबासोबत एके ठिकाणी फिरायला जातो. तिथे गेल्यावर एका रात्रीत काय होते? हे पडद्यावर अनुभवण्यातच खरी मजा आहे.          

* तुम्ही अधिक प्रमाणात विनोदी भूमिकाच साकारल्या आहेत. या हॉरर चित्रपटात काम करण्याचा विचार कसा आला? 
- खरंतर असं नाहीये. माझी सुरूवातच ‘मेरी जंग’ या चित्रपटातील माझ्या खलनायकी भूमिके पासून झाली. त्यानंतर बऱ्याच चित्रपटात मी गंभीर भूमिका साकारल्या. त्यात लष्कर, वो फिर आएगी, जजंतरम ममंतरम, फायर, बँग बँग, बेशरम असे अनेक चित्रपट आहेत. मला नेहमी काहीतरी वेगळं आणि हटके करायचे असते. त्यामुळे मी अशा भूमिका निवडतो.

* ‘टोटल धमाल’बद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल?  
- टोटल धमालचा हा तिसरा भाग असणार आहे. सध्याचे सर्व विनोदी लीडिंग कलाकार हे यात असतील. प्रत्येक भागाप्रमाणेच याही वेळेस प्रेक्षकांना धम्माल, मजा, मस्ती अनुभवायला मिळणार आहे, यात काही शंका नाही. 

* ‘मेरी जंग’ मधून तुम्ही बॉलिवूड डेब्यू केला. त्यानंतर अभिनेता, डान्सर, कोरिओग्राफर, व्हीजे म्हणून तुम्ही काम केलं. मात्र, तुम्ही स्वत:ला कोणत्या प्रकारात जास्त कम्फर्टेबल मानता?  
- मी खरंतर स्वत:ला एक एंटरटेनर मानतो. या सर्व प्रकारांतून मी स्वत:ला प्रेक्षकांसमोर ठेवत असतो. एका कलाकाराचं कामच ते असतं की, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं. त्यामुळे मी अभिनयाच्या कोणत्याही प्रकारांत स्वत:ला कम्फर्टेबल मानतो.

* तुमचे वडील जयदीप जाफरी हे देखील विनोदवीर होते. तुमच्या करिअरच्या सुरूवातीला तुम्हाला कशाप्रकारे प्रेरणा मिळाली? 
- माझे वडील बालकलाकार होते, त्यानंतर कलाकार होते आणि मग विनोदी कलाकार झाले. त्यांनी खूप जग पाहिले. मग त्यांनी मला बाहेरच्या जगाबद्दल माहिती करून दिली. इंडस्ट्रीबद्दल सांगितले. यश-अपयश आणि अभिनयाचे विविध अंग यांची ओळख करून दिली.                     

* ‘सलाम नमस्ते’ चित्रपटासाठी तुम्हाला ‘आयफा’चा बेस्ट कॉमेडिअन अ‍ॅवॉर्ड मिळाला होता. कसे वाटते जेव्हा एखाद्या कलाकाराचे पुरस्कार देऊन कौतुक केले जाते?
- होय, एखाद्या व्यक्तीचे कौतुक झाले तर त्याला नक्कीच चांगले वाटते. त्याचा आत्मविश्वास वाढतो. माझंही ‘सलाम नमस्ते’ वेळी तसंच झालं. मात्र, पुरस्कार मिळाला तरच कलाकाराचं कौतुक होतं असं नाही तर प्रेक्षकांची दाद ही देखील महत्त्वाची असते. पण, बॉलिवूड इंडस्ट्रीत पुरस्काराचं बरंच राजकारण आहे. ज्या कलाकाराला पुरस्कार मिळायला हवा, त्याला मिळतच नाही. दुसऱ्याच कुठल्या कलाकाराला पुरस्कार दिला जातो.

Web Title:  Likes to see the smile on the audience's face: Javed Jafri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.